मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का; ‘त्या’ कामांना दिली स्थगिती, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. त्यानंतर आता आणखी एकदा शिंदे सरकारच्या काळात आरोग्य विभागासाठी घेतलेला निर्णय स्थगित करण्यात आला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळात दिलेले ३,२०० कोटी रुपयांचे काम रद्द करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक कामे ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील सहकारी मंत्र्यांची आहेत. यामध्ये आता माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची यंत्रणेद्वारे तांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यासाठी वार्षिक ६३८ कोटी याप्रमाणे पाच वर्षांसाठी सुमारे ३ हजार १९० कोटी रुपयांची कामे तानाजी सावंत यांनी पुण्यातील एका खासगी कंपनीला मंजूर केली होती. ३० ऑगस्ट २०२४ रोजी या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
या संबंधात करण्यात आलेल्या आरोपांनुसार ज्या कंपनीला तांत्रिक साफ सफाईच्या कामांचा कोणताही अनुभव नाही, तरी देखील त्या कंपनीला राज्यभरातील रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे या आधी या कामासाठी वर्षाला केवळ ७० कोटी रुपये खर्च येत होता. तो खर्च देखील वाढवण्यात आला होता. तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्यस्तरावर उपलब्ध नाही. तो उपलब्ध होईपर्यंत नव्याने स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कोणतेही कारवाई देखील करण्यात येऊ नये असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्तालयाने दिले आहेत.
संजय राऊत यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
दरम्यान, संजय राऊत यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली, त्यात केवळ भ्रष्टाचारच झाला. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होते, हे सर्वांना माहीत आहे. भाजपातून भ्रष्ट मंत्र्यांचा विरोध केले गेला होता. त्यापैकीच एक आरोग्य मंत्रीही होते. सार्वजनिक आरोग्य खाते थेट जनतेशी संबंधित असते. पण त्या खात्यात भ्रष्टाचार होत असेल तर योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा भ्रष्टाचार थांबवत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करू.





