Satara | डेंगीचे लवकर निदान होण्यासाठी तपासणी गतिमान करा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – आरोग्य विभागातील जबाबदार अधिकार्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. डेंगीचे लवकर निदान व्हावे यासाठी तपासणी गतिमान करावी जे काही औषधे लागतील ती तातडीने उपलब्ध करून दिली जाते.
कोणत्याही परिस्थितीत डेंग्यूसह सात रोग आटोक्यात येतील यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी दिले.
कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील डेंग्युसह साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य विभागाकडून याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी ना. महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिक्षकांसह सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, रुग्णालयात सल्लागार समितीचे सदस्य तथा उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे,
नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, सचिनभैय्या बर्गे, सागर वीरकर, राजेंद्र वैराट, प्रीतम शहा, संतोष बर्गे, भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक फाळके, अजित विलासराव बर्गे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर गांधीले, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुंधती कदम, डॉ. निलेश दबडे, आजी-माजी नगरसेवक, विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ना. शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालय परिसराची पाहणी करताना रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. औषधोपचाराची माहिती घेतली. त्यानंतर बैठकीस सुरुवात केल्यानंतर वैद्यकीय अधिक्षकांनी आढावा सादर केला.
डेंगी निदान किटसह आवश्यक औषधे याबाबत मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत असल्याने ना. शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधून आवश्यक ते साहित्य, साधन सामुग्री आणि औषधे तातडीने कोरेगाव तालुक्यात उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आजी-माजी नगरसेवकांसह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेल्या आरोग्य सेवेविषयक प्रश्नांना डॉ. कदम यांच्यासह डॉ. दबडे यांनी समर्पक उत्तरे दिली.
स्वखर्चातून डेंगी निदान किट देणार
डेंगीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून डेंग्यूचे निदान लवकर होणे आवश्यक असते, जेणेकरून रुग्णाला वेळीच औषधोपचार करता येतात. कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात डेंगी निदान किट उपलब्धता कमी आहे ही बाब लक्षात घेऊन तातडीने स्वखर्चातून जास्तीत जास्त डेंगी निदान किट उपलब्ध करून देणार आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेंगी निदान किट आणि औषधे कमी असतील तर मागणी कळविल्यास तातडीने स्वखर्चातून ते उपलब्ध करून देणार असल्याचे ना. महेश शिंदे यांनी सांगितले.





