Pimpri-Chinchwad : महापालिका भवनात कर्णकर्कश आवाजाचा धिंगाणा; पोलिसांची ‘दबंगगिरी’ फक्त सर्वसामान्यांवरच?
Pimpri-Chinchwad : पोलीस निरीक्षकांचा अजब युक्तिवाद

पिंपरी – कायदे आणि नियम हे केवळ सामान्य नागरिकांची नाकेबंदी करण्यासाठीच असतात का? असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे. निमित्त ठरले आहे महापालिकेच्या वर्धापन दिनाचे! सोमवारी (दि. १२) महापालिका भवनाच्या आवारात कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपकांचा दणदणाट सुरू होता. आसपासच्या इमारतींमधील नागरिकांची शांतता भंग झाली.
धक्कादायक बाब म्हणजे, या कार्यक्रमासाठी महापालिकेने पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यावर कारवाई करण्याऐवजी खुद्द पोलिसांनीच “अंतर्गत कार्यक्रमाला परवानगीची काय गरज?” असा अजब बचाव करत महापालिकेच्या बेकायदेशीरपणावर पांघरूण घातले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन दिन सोमवारी महापालिका भवनात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. या कार्यक्रमात मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक (स्पीकर) लावण्यात आले होते. या कर्णकर्कश आवाजाचा नाहक त्रास समोरील आणि आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांना, वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांना सहन करावा लागला.
नियमांनुसार ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक असते. मात्र, स्वतःला शिस्तीचे भोक्ते समजणाऱ्या महापालिका प्रशासनाने अशी कोणतीही परवानगी घेण्याची साधी तसदीही घेतली नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण गोंधळात महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी स्वतः उपस्थित होते.
पोलिसांची धक्कादायक पाठराखण
या बेकायदेशीर आवाजाबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांना विचारले असता, त्यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे होते. “तो त्यांचा अंतर्गत कार्यक्रम त्यांच्याच आवारात होता, त्यामुळे त्याला परवानगीची गरज नसते,” असा जावईशोध पोलीस प्रशासनाने लावला.
कायदा फक्त चार भिंतींच्या बाहेरच लागू होतो का? अंतर्गत आवाजाचा त्रास बाहेरच्या नागरिकांना होत असताना पोलिसांना हा अंतर्गत मामला कसा वाटतो? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत.
महापालिकेला मोकळे रान का?
पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे शहरात प्रचंड चीड व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद्य वाजवले म्हणून पोलिसांनी थेट वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते.
तसेच नवरात्रोत्सवात एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत नागरिकांनी, महिलांनी गरब्यासाठी स्पीकर लावला, तरी पोलीस परवानगीचे कारण पुढे करून तत्काळ धाव घेतात आणि स्पीकर बंद पाडतात. तिथे आवाजाची तीव्रता मोजणारे आणि कायद्याचे डोस पाजणारेपोलीस महापालिका भवनासमोर दुटप्पी भूमिका का घेतात?
पदाधिकारी आणि बड्या अधिकाऱ्यांची उठबस असलेल्या ठिकाणी पोलिसांचे हात थरथरतात का, अशी चर्चा चौकाचौकात रंगली आहे. सर्वसामान्यांवर लगेच गुन्हे दाखल करणारे पोलीस प्रशासन महापालिकेच्या या बेधुंद कारभारापुढे नतमस्तक झाल्याचेच आजच्या घटनेने स्पष्ट केले आहे.
Talegaon Dabhade : तळेगावात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी





