पालिकेच्या शाळांतही वाजणार “वॉटर बेल’

महिला आणि बालकल्याण समितीसमोर प्रस्ताव
पुणे – पाणी कमी प्यायल्यामुळे शाळकरी मुलांना कमी वयातच अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. अनेकदा पाण्याची बॉटल सोबत ठेऊनही मुलांना केवळ आठवण राहत नसल्याने सोबत आणलेले पाणी पिण्याचा विसर पडतो. त्यामुळे महापालिकांच्या शाळेतही “वॉटर बेल’चा उपक्रम राबवण्यात यावा, असा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महिला आणि बालकल्याण समितीसमोर ठेवला आहे.
केरळच्या काही शाळांमध्ये मुलांना पाण्याची आठवण करून देण्यासाठी “वॉटर बेल’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात ठराविक अंतराने पाणी पिण्यासाठी स्वतंत्र बेल वाजवण्यात येते. या उपक्रमांचा मुलांना मोठा फायदा होत असून मुले तसेच पालकांकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा ठराव खर्डेकर यांनी दिला आहे. तसेच मनपा शाळांप्रमाणेच खासगी शाळांमधील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठीही हा उपक्रम राबवण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्व शाळांना सूचना तसेच आदेश देण्यात याव्यात, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.





