पिंपरी | रस्त्यावरील पाणी अन् खड्ड्यांचा दुचाकींना फटका

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नेहमीप्रमाणे सखोल भागात पाणी साचले आहे. काही दुचाकीस्वार साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्याचा प्रयत्न करतात.
मात्र त्यांचा हा प्रयत्न अंगाशी येताना दिसत आहे. पाण्यात गाडी गेल्यामुळे ती बंद पडते. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचाही दुचाकींना फटका बसत आहे.
त्यामुळे नाइलाजाने का होईना गाडी गॅरेजमध्ये न्यावी लागते. यामुळे स्पेअर पार्टचे विक्रते आणि गॅरेजचा व्यवसाय सध्या जोमात आहे. दुचाकी दुरूस्तीसाठी हजारो रुपयांचा खर्च येत आहे.
पावसाळा सुरू झाला, की पावसाच्या पाण्याने वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. दुचाकी, चारचाकी वाहनांचा यात समावेश असतो. त्यातल्या त्यात दुचाकीचे प्रमाण अधिक असते.
चारचाकी वाहनांचे इंजिन बंदिस्त असल्याने सहसा पावसाचा त्यावर परिणाम होत नाही. मात्र दुचाकीचे इंजिन पूर्णतः उघडे असल्याने पावसाचे पाणी जाऊन नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्लग खराब होऊन भर पावसात रस्त्यांवर दुचाकी बंद पडत आहेत.
पर्याय नसल्याने वाहनचालक सरळ गॅरेज गाठत आहेत. रस्त्यावर साचणारे पाणी विशेषतः वाहन रस्त्याने धावताना प्लगमध्ये पाणी जाऊन प्लग खराब होतात. त्याचप्रमाणे जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अंदाज येत नाही.
त्यात वाहने फसून वाहनांचे अपघात होऊन नुकसान होते. वाहन जागेवरच बंद पडते. अशा एक ना अनेक समस्या पावसामुळे निर्माण होत असल्याने सध्या गॅरेज व्यवसाय तेजीत आला आहे.
जागोजागी असलेले प्रत्येक दुचाकीचे गॅरेज नादुरुस्त वाहनांनी भरलेले दिसत आहे. गॅरेज चालकाला वाहनांचे काम करण्यासाठी अतिरिक्त कामगारांची आवश्यकता भासत आहे.
स्पेअर पार्ट व्यवसायही जोमात
गॅरेज व्यवसायावर स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय अवलंबून आहे. वाहने दुरुस्त करत असताना विविध वस्तूंची आवश्यकता भासत असते.
त्या वस्तू स्पेअर पार्ट विक्रेता दुकानावर उपलब्ध असल्याने नागरिक त्या खरेदी करत असतात. ब्रेक लायनर, ब्रेक ऑइल, प्लग यांसह विविध वस्तूंची खरेदी-विक्री अधिक होत असल्याने त्यांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे स्पेअर पार्ट व्यवसायही तेजीत आहे.
दुचाकी नादुरुस्तीचे कारणे
– पावसाच्या पाण्याने प्लग खराब होणे
– पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी जाणे
– खड्ड्यांमध्ये वाहने आदळून नुकसान होणे
– रस्त्यावर वाहने घसरून वाहनाचे नुकसान होणे
– पाण्यामुळे वायरिंग खराब होणे
– खड्ड्यातील टोकदार दगडांमुळे पंक्चर होणे
– कार्बोरेटरमध्ये पाणी, कचरा साचून वाहन बंद पडणे
– पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरूस्ती न केल्याने ब्रेक न लागणे





