सांडपाणी शुद्धीकरणाची क्षमता वाढणार; प्रकल्प अद्ययावतीकरण आराखड्यास राज्य शासनाची मान्यता

पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेकडून “जायका’ प्रकल्प राबवला जात आहे. यात सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रकल्प आराखड्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. आता फक्त केंद्र शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यात राज्य शासनाने त्रुटी काढल्या होत्या. त्यामुळे प्रस्ताव रखडला होता. अखेर शुक्रवारी आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रकल्पाचे सादरीकरण नगरविकास प्रधान सचिव गोंविदराज यांच्याकडे केले. त्यात त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी दिली. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या “अमृत-2′ योजनेत पाठवण्यात येणार आहेत.
या कामासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मागील सहा महिन्यांपासून हे प्रस्ताव प्राधिकरणाच्या मान्यतेच्या फेऱ्यात अडकले होते. आता प्रकल्पांची क्षमता दैनंदिन 99 एमएलडीने वाढणार आहे. सध्या हे प्रकल्प दररोज 477 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करत आहे. त्यांची क्षमता वाढून 576 एमएलडी प्रतिदिन होणार आहे.
काय होती शासनाला शंका?
या सहापैकी दोन प्रकल्पांमध्ये “एसबीआर’ तंत्रज्ञान आहे. तर चार प्रकल्पांसाठी “आयफाज’ तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. नगर विकास विभागाने “आयफाज’ तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केल्याने हा प्रकल्प मंजूर होत नव्हता. दरम्यान, याच तंत्रज्ञानावर आधारित सुरत, दिल्ली येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यांना अमृत योजनेमधून केंद्राने व राज्याने मदत केल्याचे महापालिकेने निदर्शनास आणून दिले आहे.





