Top 15 News: शरद पवारांच्या बचावासाठी विखे-पाटील मैदानात, सर्वसामान्यांना महागाईचा डबल झटका? आणि ‘स्वामीं’वर नेमा करून व्यवसाय नाही करणार’, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: डिलिमिटेशन विधेयकाच्या भूमिकेवरून शरद पवारांवर टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

शरद पवारांच्या बचावासाठी विखे-पाटील मैदानात;
वडेट्टीवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Top 15 News: डिलिमिटेशन विधेयकाच्या भूमिकेवरून शरद पवारांवर टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पवार हे ज्येष्ठ नेते असून, वडेट्टीवारांनी बोलताना भान ठेवावे, असे ते म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण देशासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत विखे-पाटील यांनी विधेयकाचे समर्थन केले. पवार-विखे घराण्याचे जुने राजकीय वैर पाहता, विखे-पाटलांची भूमिका चर्चेत आली आहे.
डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनावरून राष्ट्रवादीत नाराजी;
अभय जगतापांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राजीनामा सत्र सुरूच आहे. युवक प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाने पाठिंबा दिल्याने नाराजी व्यक्त करत, भाजपशी हातमिळवणी करायची असेल तर कार्यकर्त्यांनी थेट भाजपमध्येच जावे, असा सवाल त्यांनी केला. शरद पवारांवरील प्रेम कायम असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
एक मसाप, दोन अध्यक्ष !
महाराष्ट्र साहित्य परिषदेत अविश्वास ठराव बैठकीत गोंधळ
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अंतर्गत वादाला शुक्रवारी नवे वळण मिळाले. विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधातील अविश्वास ठरावाच्या बैठकीत गोंधळ झाला. ठराव २० विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाल्याचा दावा करत सुनील महाजन यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. मात्र, अध्यक्ष योगेश सोमण गटाने बैठक तहकूब झाल्याने ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगितले. घटनेच्या वैधतेवरून दोन्ही गटांत मतभेद असून, मसापमध्ये आता दोन अध्यक्षांचे दावे समोर आले आहेत.
‘अँटी नॅशनलिस्ट ठरवलं तर पद्मभूषण माना’;
जावेद अख्तर यांचा रोखठोक सल्ला
‘शिक्षणाच्या मूलभूत अधिकारासाठी आग्रही राहिल्यास अँटी नॅशनलिस्ट ठरवले जाते. त्यामुळे हे बिरूद पद्मभूषण पुरस्कार मानावे,’ असा रोखठोक सल्ला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी दिला. महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त पुण्यात त्यांना २३ वा राष्ट्रीय समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन देत सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण दुटप्पी असल्याची टीकाही त्यांनी केली. शिक्षण ही सरकारची जबाबदारी असल्याचे अख्तर म्हणाले.
दोन पालखी सोहळ्यांचा भक्तिमय संगम
संत नामदेव महाराज आणि पांडुरंगाच्या पादुकांना नीरा स्नान Top 15 News:
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्तिकी सोहळ्यासाठी आळंदीकडे निघालेल्या संत नामदेव महाराज आणि पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यांचा शनिवारी नीरा नदीच्या दत्त घाटावर भक्तिमय संगम झाला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. दर्शनानंतर दोन्ही पालख्या नीरा येथून वाल्हे मुक्कामासाठी रवाना झाल्या. पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यात २६ दिंड्यांसह सुमारे सात हजार वारकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण आणि प्रशासनाच्या सुविधांची मागणी करण्यात आली.
RNO – मोदी-शहांनी अनेक पक्षांचे मतपरिवर्तन केले;
डिलिमिटेशनला हसन मुश्रीफांचा पाठिंबा
डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले. त्यांच्या मते, लोकसंख्येच्या आधारे जागा वाढवण्यास विरोध करणाऱ्या अनेक पक्षांचे मतपरिवर्तन झाले आहे. जागा वाढल्याने महिला, अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षणाचा लाभ मिळेल. तसेच मोठे मतदारसंघ लहान झाल्याने खासदारांचा जनतेशी संपर्क आणि विकासकामांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिल्याचेही त्यांनी स्वागत केले.
RNO – महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा वाढवाव्याच लागतील;
धनंजय महाडिक यांची ठाम भूमिका
महिला आरक्षण लागू करण्यासाठी लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. परिसीमन विधेयकात लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ करण्यासह महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसंख्या वाढल्याने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवणे गरजेचे आहे. जागा वाढल्यास एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षित जागाही वाढतील, असे महाडिक म्हणाले. शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी स्वागत केले.
दक्षिण भारतात पावसाचा अंदाज;
उत्तर प्रदेश, हिमाचलमध्ये धुक्याचा इशारा
देशाच्या बहुतांश भागांत २९ नोव्हेंबर रोजी हवामानात मोठे बदल अपेक्षित नसले, तरी दक्षिण भारतातील काही राज्यांत पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांत सकाळी दाट धुके राहण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना महागाईचा डबल झटका?
खाद्यपदार्थांच्या दरवाढीचा केंद्राचा इशारा
आगामी काही महिन्यांत देशात महागाई वाढण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. हवामानातील अनिश्चितता, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यातील अडथळे आणि लग्नसराईमुळे वाढणारी मागणी ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. केंद्राच्या मासिक आर्थिक अहवालानुसार, खाद्यपदार्थ, कपडे आणि घरगुती वस्तूंच्या किमती वाढू शकतात. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे इंधन आणि मालवाहतुकीचा खर्चही वाढण्याचा धोका आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमाई आणि रुपयातील मजबुती महागाईला काही प्रमाणात आळा घालू शकते.
इस्रायलमध्ये सत्तास्थापनेचा पेच;
नेतान्याहूंचा आयसेनकोट यांना PM पदाचा प्रस्ताव
इस्रायलमध्ये निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. नेतान्याहू यांच्या आघाडीला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते आयसेनकोट यांच्यासोबत ‘रोटेशनल’ पंतप्रधानपदाचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. यानुसार आयसेनकोट प्रथम पंतप्रधान होऊ शकतात. मात्र, लिकुड पक्षातच या प्रस्तावावर मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. आयसेनकोट यांनी लिकुड गंभीर चर्चा करत नसल्याचा आरोप केला. तर ॲव्हिगडोर लिबरमन यांनी हा प्रस्ताव राजकीय खेळी असल्याचा इशारा दिला आहे.
डोळ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या ८ सवयी;
आजच करा हे महत्वाचे बदल!
डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतत मोबाईल पाहणे, अपुरी झोप, डोळे चोळणे, सनग्लासेस न वापरणे आणि कॉन्टॅक्ट लेन्सची चुकीची काळजी यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. नियमित तपासणी न करणे, कमी पाणी पिणे आणि पोषक आहाराकडे दुर्लक्ष करणेही नुकसानकारक ठरू शकते. स्क्रीन वापरताना २०-२०-२० नियम पाळा आणि त्रास जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
श्रीलंका मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा?
रोहित-विराटच्या पुनरागमनाची शक्यता
न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. वृत्तानुसार, आज २९ नोव्हेंबरला संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसू शकतात. हर्षित राणाचे पुनरागमन अपेक्षित असून, जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. सिराजच्या निवडीकडेही लक्ष लागले आहे.
‘स्वामी समर्थांवर सिनेमा करून व्यवसाय नाही करणार’;
केदार शिंदे स्पष्टच बोलले
मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी श्री स्वामी समर्थांवरील चित्रपटाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘मी स्वामींचा भक्त आहे, पण त्यांच्यावर आधारित सिनेमा करून व्यवसाय करू शकत नाही,’ असे ते मुलाखतीत म्हणाले. स्वामींचे नामस्मरण आणि पोथीवाचन करतो, मात्र त्यांच्या भक्तीला व्यवसायाचा भाग बनवू इच्छित नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
‘एकाच छताखाली राहूनही भावनिकदृष्ट्या दूर’;
अभिनेता मनीष नागदेवचा घटस्फोट
‘अनुपमा’ मालिकेतील अभिनेता मनीष नागदेव याचा पत्नी मलिका जुनेजा हिच्याशी घटस्फोट मंजूर झाला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मनीषने सांगितले की, सहा महिने दोघांमध्ये संवाद जवळपास बंद होता. नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करूनही दोघे जीवनसाथी म्हणून योग्य नसल्याची जाणीव झाली. हा निर्णय विचारपूर्वक आणि परस्पर आदर राखून घेतल्याचेही त्याने स्पष्ट केले.
ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याबाबत चर्चांना पूर्णविराम?
शायना एनसी यांनी शेअर केला खास व्हिडीओ Top 15 News:
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान शायना एनसी यांनी दोघांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. जुन्या मैत्रीतील विश्वास आणि आपुलकी व्यक्त करत त्यांनी ऐश्वर्या-अभिषेकसोबत वेळ घालवल्याचा आनंद सांगितला. ऐश्वर्या आणि शायना यांची मैत्री अनेक वर्षांपासून आहे. दरम्यान, आराध्याचा १५ वा वाढदिवस ऐश्वर्याने माहेरच्या कुटुंबासोबत साजरा केला होता.





