Sonia Gandhi: काँग्रेसचा दुष्काळी भागाला १० ट्रक चारा
Sonia Gandhi:

सोनिया गांधीच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात विविध कार्यक्रम
Sonia Gandhi: काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह विविध उपक्रमांद्वारे साजरा होणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून गुरुवारी (दि.३) दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी दहा ट्रक चारा पाठविण्यात येणार असल्याची माहिती सप्ताहाचे निमंत्रक अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्याग सप्ताहाचे उदघाटन बुधवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होईल. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार साजिद खान, पुणे शहर काँग्रेस (पूर्व) अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर काँग्रेस (पश्चिम) अध्यक्षा दीप्ती चवधरी, महापालिकेतील काँग्रेस गटनेते चंदूशेठ कदम उपस्थित राहणार आहेत.
चारा पाठविण्याच्या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांच्या बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष प्रकट मुलाखत होणार ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा हे मुलाखत घेतील. सोनिया गांधी यांचा जीवनप्रवास, सामाजिक व राजकीय वाटचाल आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान यावर मुलाखतीतून प्रकाश टाकला जाईल.
या सप्ताहाच्या माध्यमातून महिला उद्योजकांचा सन्मान, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती, दिव्यांग मुलांसाठी आनंदोत्सव, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरे, तृतीयपंथीयांचा सन्मान, रोजगार मेळावे, क्रीडा व चित्रकला स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शने आणि विविध सामाजिक विषयांवरील परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.





