Warkari Healthcare: वारीत आरोग्य विभागाचा मोठा रेकॉर्ड! १५ जुलैपर्यंत ३ लाखांहून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
Warkari Healthcare: ३ लाख १५ हजार वारकऱ्यांना ओपीडी सेवा; ताप, उच्च रक्तदाब आणि श्वसनविकाराच्या हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार.

Warkari Healthcare – आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून, १५ जुलैपर्यंत तब्बल ३ लाख १५ हजार २१ वारकऱ्यांना बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा देण्यात आली आहे. याशिवाय २ हजार ७६१ रुग्णांवर दाखल करून उपचार करण्यात आले असून, ६२० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाने पालखी मार्गावरील प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे नियोजन यशस्वीपणे राबविले आहे. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, आयसीयू सुविधा, बाईक ॲम्बुलन्स, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
वारीदरम्यान ताप, श्वसनविकार, अतिसार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या विविध आरोग्य समस्यांवर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. १५ जुलैपर्यंत १९ हजार ३६ तापाच्या रुग्णांवर, ११ हजार ३०४ श्वसन संसर्गाच्या रुग्णांवर, ६ हजार २४५ उच्च रक्तदाब, ५ हजार ४६९ मधुमेह तसेच ९ हजार ९७७ अतिसाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर अहोरात्र कार्यरत आहेत.
यंदाच्या वारीत प्रथमच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ‘आरोग्यसंपन्न वारी’ मोबाईल ॲपद्वारे पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा, उपचार केंद्रे, रुग्णवाहिका आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांची माहिती वारकऱ्यांना सहज उपलब्ध होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रस्ते अपघात, हृदयविकार आणि इतर गंभीर रुग्णांनाही तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
याशिवाय पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ आयसीयू सुविधा, १५६ प्राथमिक उपचार केंद्रे, २१५ आरोग्यदूत, पंढरपूर येथे २४x७ आयसीयू सुविधा, तसेच महाआरोग्य शिबिर, महिलांसाठी हिरकणी कक्ष, दिंडी प्रमुखांना औषध संच, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, कीटकजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य जनजागृतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.





