Pakistan plane : जायचे होते कराचीला, पोचवले सौदी अरेबियाला; पाकिस्तानच्या विमानाचा अजब कारभार

Pakistan plane – पाकिस्तानमधील सर्व कारभार विचित्र असतो, याचे आणखी एक अजब उदाहरण समोर आले आहे. लाहोरमधून कराचीला जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला लाहोर ऐवजी थेट सौदी अरेबियाला पोचवण्यात आले. मात्र झालेला गोंधळ उघड झाल्यावर या प्रवाशाला मायदेशी परत पाठवण्यात आले. ही घटना ७ जुलै रोजी एअरसियालच्या विमानात कराची येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर मलिक शाहजैनसोबत घडली.
या असामान्य घटनेची चौकशी केली जात असल्याचे नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. एखादा प्रवासी चुकीच्या विमानात बसण्याची चूक होऊ शकते. मात्र देशांतर्गत प्रवास करणारा प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानात बसल्याची चूक सहसा होऊ दिली जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिनांक, ७ जुलैच्या रात्री शाहजैन यांना त्याचा मुलगा आजारी पडला असल्याचे कळले. त्यामुळे ते लाहोरहून कराचीला परतत होते. विमानतळावर वेळेवर पोचल्यावर त्यांनी बोर्डिंग पास घेतला. टर्मिनसवर दोन विमाने उभी होती. त्यातील एक कराचीला जाणारे आणि दुसरे सौदीतील जेद्दाहला जाणारे होते.
कोणतीही तपासणी न करता आपल्याला जेद्दाहच्या विमानात बसवण्यात आले. दोन तास उलटून गेल्यानंतरही विमान उडत राहिल्याने काही तरी चुकल्याचे आपल्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शाहजैन जेद्दाहला पोचले होते. तर त्यांचे सामान कराचीला पोचले होते.
जेद्दाह विमानतळावर, शाहजैनची इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तासन्तास चौकशी केली आणि नंतर त्यांना कळले की तो त्याच्या कोणत्याही चुकीशिवाय तेथे उतरला आहे. त्यांनी एअरलाइनला कराचीला जाणाऱ्या त्यांच्या पुढच्या विमानात बसवण्याचे निर्देश दिले.





