Sonam Wangchuk : वांगचुक यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं..
शिक्षण आणि पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक यांचे उपोषण मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरू राहिले. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.

Sonam Wangchuk – शिक्षण आणि पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक यांचे उपोषण मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरू राहिले. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली.
नीट आणि इतर परीक्षांच्या गोंधळाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी सीजेपीची मागणी आहे. त्यासाठी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि इतर सदस्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सलग ११ दिवसांपासून ठिय्या दिला आहे.
आंदोलकांना साथ देण्यासाठी वांगचुक यांनी त्या आंदोलनस्थळी रविवारपासून उपोषण सुरू केले. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी घटल्याबद्दल सीजेपीकडून चिंता व्यक्त करण्यात आली.
वांगचुक यांच्या प्रकृतीविषयीची स्थिती गांभीर्याने घेतली जावी. वांगचुक यांच्याबाबत काही अयोग्य घडल्यास प्रधान जबाबदार असतील, असा इशाराही सीजेपीने दिला.
आंदोलकांसमोर बोलताना दिपके याने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या चिंतांकडे लक्ष देण्याऐवजी सरकारचा संपूर्ण फोकस राजकीय कृतींवर आहे, अशी नाराजी त्याने व्यक्त केली.





