Parli : पांदण रस्त्याच्या कामासाठीचे दगडवाडी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित; पावसाळ्यानंतर काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Parli : परळी तालुक्यातील दगडवाडी ते सटवाई पांदण रस्त्याचे काम मंजूर होऊनही प्रत्यक्षात सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी मंगळवार (दि. २३) पासून आमरण उपोषण सुरू केले होते.

Parli : परळी तालुक्यातील दगडवाडी ते सटवाई पांदण रस्त्याचे काम मंजूर होऊनही प्रत्यक्षात सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी मंगळवार (दि. 23) पासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र पंचायत समिती प्रशासनाने कामाबाबत ठोस आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
दगडवाडी येथील मधुकर तांदळे व इतर ग्रामस्थांनी रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत पंचायत समितीकडे निवेदन दिले होते. त्यानंतर गटविकास अधिकारी, पंचायत समिती परळी यांनी ग्रामस्थांना लेखी पत्र देत, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने संबंधित रस्त्याचे काम करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असल्याचे स्पष्ट केले.
पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कामास प्रारंभ करून २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत दगडवाडी ते सटवाई पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाने पत्राद्वारे आश्वासन दिले आहे. तसेच निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.





