वाल्मीक कराडला मकोका; किती शिक्षा होणार, काय आहे कायदा? जाणून घ्या

बीड – जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून याप्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी एक आरोपी वगळता सर्वच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर अद्यापही 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. पण, सीआयडीकडून आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता कराडवरी मकोका लावण्यात आला आहे.
मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने आता वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोकोका लावला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल नाही. दरम्यान, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोकाअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.
मकोका म्हणजे काय? आरोपीला किती शिक्षा होते?
काय आहे मकोका कायदा –
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अॅक्ट (MCOCA) म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी 1999 मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो. संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही.
कायद्यात काय आहे तरतुदी –
मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो. या कायद्यात पोलिसांना 180 दिवस दोषारोपत्र दाखल करण्यासाठी मिळतात. हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. एका आरोपीवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील, तेव्हाच हा कायदा लावला जातो. या कायद्यातंर्गत आरोपीचा कबुलीजबाब नोंदवता येतो. त्या कबुलीजबाबाचा वापर इतर सहआरोपींसाठी करता येतो. मकोको कायदा फरार आरोपीवरही लावता येतो. त्याची संपत्ती जप्त करता येते. त्याची बँक खाती गोठवता येते.
आरोपींना होऊ शकते जन्मठेप –
मकोका कायदा कठोर आहे. हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही. यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षांची व कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे. गुन्हा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतो, त्या ठाण्याचा अंमलदार संबंधित आरोपींवर टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवतो. शहरी भागामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला जातो, तर ग्रामीण भागामध्ये स्पेशल आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो. या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका त्या – त्या प्रकरणांत लावला जातो.
एखाद्या टोळीवर मकोका लावण्यात आला तर त्याचा तपास शहरी भागात एसपी दर्जाचा अधिकारी तर ग्रामीण भागामध्ये डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतो. 180 दिवसापर्यंत पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते. मकोका लागल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही. विशेषतः गुन्ह्याचा तपास होत नाही तोपर्यंत जामीन दिला जात नाही. पुढे देखील आरोपींना जामीन मिळणे कठीण असते. मकोका गुन्ह्यात किमान 5 ते 10 वर्षांची शिक्षा व 5 लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरुपावरुन ठरत असते. या प्रकरणी आरोपींना जन्मठेप किंवा फाशीही होऊ शकते.
समर्थकांकडून परळी बंदची हाक, रस्त्यांवर शुकशुकाट –
वाल्मीक कराडवर मकोका लावल्याची बातमी समजताच कराड समर्थकांकडून परळी शहर बंदची हाक देण्यात आली. 10 मिनिटाच्या आत वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ परळीतील दुकाने बंद करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहेत. दरम्यान, नेमके काय झाले याबाबत माहिती नाही. सर्वांनी दुकाने बंद केल्यामुळे आम्ही पण आमचे दुकान बंद केल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वाल्मीक कराडच्या आईचे परळी शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन –
वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. माझ्या लेकाने काही केले नाही. माझ्या लेकाला विनाकारण अडकवत आहेत, तो देवमाणूस आहे, हे सर्व परळीला माहीत आहे, असे त्या म्हणाल्या.
माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही, तो पर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हलणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. माझ्या लेकाला सोडा, त्याने काही केले नाही, असेही त्यांनी म्हटले. बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी चुकीचे आरोप केलेत. या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक करून माझ्या लेकरावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणीही पारूबाई कराड यांनी केली.





