Ayush Komkar Case : नगरसेविका लक्ष्मी आंदेकरांचा मुक्काम जेलमध्येच! आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयाचा दणका
Ayush Komkar Case : जामीन दिला तर पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकेल"; सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज.

Ayush Komkar Case – माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणातील मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आरोपी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. टोळीप्रमुख बंडू यांच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी आयुषचा खूनाचा कट आखल्याची माहिती लक्ष्मी हिला होती.
गोपनीय साक्षीदाराने पोलिसांकडे दिलेल्या माहितीवरून तिचा सहभाग निष्पन्न होत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने येरवडा कारागृहात असलेल्या लक्ष्मी हिने जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता.
त्यास सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. लक्ष्मी हिने केलेला गुन्हा हा अतिसंवेदनशील असून, दोन गुन्हेगारी टोळीतील पूर्ववैमनस्य, तसेच पुतण्या वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घडवून आणला आहे. लक्ष्मी ही गुन्हेगारी टोळीची सक्रीय सदस्य आहे. साक्षीदारांची चौकशी, तसेच जबाबातून तिचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे.
गुन्हा घडण्यापूर्वी, तसेच त्यानंतर ती अन्य आरोपींच्या संपर्कात होती, हे तांत्रिक विश्लेषणावरून स्पष्ट झाले आहे. ती नऊ दिवस फरार होती. त्यानंतर तिला गुजरात येथील द्वारका येथून ताब्यात घेण्यात आले, तसेच ती नगरसेविका असल्याने तिला जामीन मंजूर झाल्यास ती सदर भागातील बेकायदेशीर जमाव जमवून प्रभागात उभारलेल्या अनधिकृत बांधकाम कारवाईवर अडथळा आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.




