Walking: मधुमेह हा आजच्या काळातील सर्वात सामान्य आजारांपैकी एक बनला आहे. फक्त औषधे आणि आहारावर अवलंबून राहून साखर नियंत्रणात ठेवणे नेहमीच शक्य होत नाही. त्यासाठी योग्य व्यायाम आणि चांगली जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची असते. विशेषतः नियमित चालण्याची सवय मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. अनेक वेळा लोक योग्य आहार घेतात आणि वेळेवर औषधेही घेतात, तरीही रक्तातील साखर वाढलेली दिसते. यामागे ताणतणाव, अपुरी झोप, रात्री उशिरापर्यंत जागरण आणि जेवणानंतर लगेच झोपणे अशी कारणे असू शकतात. त्यामुळे मधुमेहींनी रोज चालण्याची सवय लावणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, नियमित चालल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी, वजन आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. चालण्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि मानसिक आरोग्यही सुधारते. तसेच सांधे लवचिक राहण्यास मदत होते. (Walking) आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या लोकांनीही रोज किमान ३० मिनिटे चालण्याचा प्रयत्न करावा. मात्र, सुरुवातीला एकदम जास्त चालू नये. सुरुवातीला १० मिनिटांपासून सुरुवात करून नंतर हळूहळू वेळ वाढवत ३० मिनिटांपर्यंत पोहोचावे. Benefits of walking मधुमेहींसाठी जेवणानंतर चालणे विशेष फायदेशीर मानले जाते. कारण जेवणानंतर शरीरातील साखरेची पातळी वेगाने वाढते. अशावेळी हलके चालल्यास शरीर ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी करू लागते. त्यामुळे साखर अचानक वाढत नाही. (Walking) डॉक्टरांच्या मते, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी चालणे उत्तम ठरते. साधारण १० ते २० मिनिटे संथ गतीने चालल्यास पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. आजकाल दररोज १० हजार पावले चालण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, मधुमेहींनी सुरुवातीला ५ हजार ते ७ हजार पावले चालली तरी ते पुरेसे ठरू शकते. शरीराची सवय झाल्यानंतर हळूहळू पावलांची संख्या वाढवता येते. चालताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे. आरामदायक चप्पल किंवा शूज वापरावेत. खूप वेगाने किंवा शरीरावर ताण येईल इतके चालू नये. तसेच पुरेसे पाणी पिणेही गरजेचे आहे. नियमित चालणे ही एक साधी पण प्रभावी सवय आहे. योग्य आहार, वेळेवर औषधे आणि रोजचे चालणे यांचा समतोल राखल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे होऊ शकते.