Walkathon for Health 2026 : नांदेड सिटीत 80 डॉक्टरांची हेल्थ वॉक; ‘Fit Doctor, Fit Society’चा दिला संदेश
Walkathon for Health 2026 : पुण्यातील नांदेड सिटी येथे PSRDA आणि NCRDA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'Walkathon for Health 2026' मध्ये सुमारे 80 डॉक्टरांचा सहभाग. 'Fit Doctor, Fit Society'चा संदेश देत विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Walkathon for Health 2026 : आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी PSRDA आणि NCRDA यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी येथे ‘Walkathon for Health 2026’ या विशेष उपक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नांदेड सिटी आणि परिसरातील सुमारे 80 डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, ‘Fit Doctor, Fit Society’ आणि ‘Healthy Doctors, Healthy Society’ हा संदेश कृतीतून दिला.
दैनंदिन व्यस्त वैद्यकीय सेवेतून वेळ काढत डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, हा संदेश या वॉकथॉनमधून अधोरेखित करण्यात आला. आरोग्यदायी सवयी, नियमित व्यायाम आणि तंदुरुस्त जीवनशैली समाजात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे PSRDAच्या अध्यक्षा डॉ. राजश्री काकडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे नियोजन, तसेच NCRDAच्या कोषाध्यक्ष डॉ. वैशाली गोमसाळे यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यांच्या प्रभावी समन्वयामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
वॉकथॉनमधील विजेते –
पुरुष (50 वर्षांवरील)
-डॉ. अनिल भांडवलकर, डॉ. श्रीरंग बारी
पुरुष (50 वर्षांखालील)
– डॉ. सचिन लकडे, डॉ. निलेश कोलपकर
महिला (50 वर्षांवरील)
-डॉ. अस्मिता भांडवलकर,
महिला (50 वर्षांखालील)
-डॉ. रेश्मा लोणकर, डॉ. साक्षी सेठ
विजेते, उपविजेते आणि सहभागी सर्व डॉक्टरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
‘निरोगी डॉक्टरच घडवू शकतात निरोगी समाज’
अशा उपक्रमांमुळे डॉक्टरांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास, परस्पर स्नेह आणि संघभावना दृढ होण्यास तसेच सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होण्यास मदत होते, असे आयोजकांनी नमूद केले. भविष्यातही अशा आरोग्यदायी आणि प्रेरणादायी उपक्रमांना डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
NCRDAचे अध्यक्ष डॉ. अनिल दूधभाते यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचे, विजेते-उपविजेत्यांचे तसेच आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या PSRDA आणि NCRDAच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. “निरोगी डॉक्टरच निरोगी समाज घडवू शकतात,” हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.






