यवत – दौंड तालुक्यातील वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्र येथे सोमवार (दि.२१) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणी तिघांना दौंडच्या न्यायालयाने सोमवार (दि.२८) पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कैलास हिरामण उर्फ बाळासाहेब मांडेकर (वय ५०), गणपत बाजीराव जगताप (वय ४८), रघुनाथ शंकर आव्हाड (वय ३८), असे तिघांना सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान चंद्रकांत मारणे हा आरोपी अद्यापपर्यंत फरार होता. मात्र, तो चौथा आरोपी दौंड न्यायालयात उशिरा हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दौंड तालुक्यातील वाखारी येथे (दि.२१० रोजी न्यू अंबिका कला केंद्रात लावणी व डीजे वरील गाणे वाजवणे व नाचण्यावरून बाळासाहेब मांडेकर याने गोळीबार केला. घटना घडल्यापासून दोन दिवस कला केंद्राच्या व्यवस्थापन आणि मालक यांनी ही घटना लपवून ठेवली होती. मात्र, प्रसारमाध्यमांच्या तत्परतेमुळे ही घटना उघडकीस येऊन यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच रात्री पोलिसांनी पुण्यातून तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करून यवत ग्रामीण रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करून गुरुवार (दि.२४) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पुढील पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दौंडच्या न्यायालयात आरोपींच्या जामीनावर सुनावणी झाली. तब्बल पाऊण तास या संदर्भात सरकार पक्षाच्या व आरोपीच्या वकिलांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी पाच दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान, फरार आरोपी चंद्रकांत मारणे यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याला उद्या न्यायालयात दाखल केले जाणार आहे. कलाकेंद्रात दोनदा गोळीबार वाखारी येथील कलाकेंद्र हे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. पुण्यासह अनेक जिल्ह्यातून शौकीन याठिकाणी येत आहेत. मात्र, कलाकेंद्रात पूर्वी पण असाच गोळीबारची घटना घडली होती. आत्तापर्यंत दोनदा याठिकाणी गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात आहे. याठिकाणी येणाऱ्या शौकीनामध्ये गुन्हेगार प्रवृतीच्या लोकांचा जास्त सहभाग असल्याने येथे वेळोवेळी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कला केंद्राला वेळेचे बंधन नाही दौंड तालुक्यातील वाखारी, बोरीपार्धी, देऊळगाव गाडा याठिकाणी तीन कला केंद्र आहेत. मात्र, कला केंद्राची सुरु आणि बंद होण्याची वेळ शासनाने ठरवून दिली आहे. मात्र, तरीदेखील ही कला केंद्र रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे येथील नागरिक बोलत आहेत. त्यांच्यावर वेळेचे बंधन नाही का, असा देखील संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होऊ लागला आहे. मात्र केंद्राच्या माध्यमातूम काही तरी चिरीमीरी पोलीस प्रशासनास मिळत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा घटना उघडकीस यायला वेळ लागत असल्याचे नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत.