“करोना’च्या लढाईसाठी वाई तालुकाही सज्ज

वाई – संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धूमाकुळ घातल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. जीवनावश्यक व्यवहार सोडले तर लागण होण्याच्या भीतीने स्वतःहून अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय- धंदे बंद ठेवले आहेत. याचा परिणाम वाई शहरासह ग्रामीण भागातसुध्दा जाणवू लागला आहे. महामंडळाने एसटीच्या फेऱ्या 50 टक्के बंद केल्या आहेत.
हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृह, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडा बाजार, सरकारी बॅंका वगळता एकाही खासगी अथवा सहकारी बॅंकेत लोक जाण्यास धजावत नाहीत. वाई तालुक्यात एकाही करोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळलेला नाही. परंतु सोशल मीडियामुळे लोकांमध्ये एक प्रकारची सजगता निर्माण झाली आहे. करोना संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्यासाठी अनेक जण सतर्क झाल्याचे चित्र ग्रामीण भागातही दिसू लागले आहे. तरीही बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांबाबत जागरूक राण्याची गरज आहे.
राजकीय पक्षांनी इतर कोणत्याही कारणासाठी “बंद’चे आवाहन केले असते तर, लोकांनी व्यवहार बंद ठेवले नसते. पण करोनाच्या धास्तीने लोक स्वयंस्फूर्त उपायांची अंमलबजावणी करत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने अनेक उपाय सुचविले आहेत. हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे शक्यतो टाळणे, हस्तांदोलन करू नये, मास्कचा वापर करावा, शासनाने सुट्टी जाहीर केली म्हणून पिकनिक अरेंज करू नका, अशा अनेक सूचना लिहिलेले फ्लेक्स बोर्ड पालिकेने शहरात लावलेले आहेत. तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बाजार समितीमध्ये आजही ग्रामीण भागातून शेतकरी शेतातील माल विक्रीसाठी आणताना दिसत आहेत.
शहरातील छोटे- मोठी दुकाने आजही सुरू आहेत, खूप कमी नागरिक मास्क वापरताना दिसत आहेत. वाई शहराच्या नाक्यावर करोना तपासणी होणे गरजेचे असताना तालुका वैद्यकीय अधिकारी अजूनही याबाबत अनभिज्ञ दिसत आहेत. दुपारच्या वेळेस शहरात मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे. तहसीलदारांनी करोनासंदर्भात काय उपाययोजना कराव्यात, या बाबत आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे.
तालुक्यातील यात्रा, जत्रा, रद्द झाल्याचे जाहीर केले असून, तर गणपती मंदीर, सोनजाई मंदीर, मांढरदेव येथील काळूआई मंदिरासह तालुक्यातील मंदिरे येऊन भाविकांनी दर्शनासाठी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाचगणी- महाबळेश्वर तसेच धोम बोट क्लब, यांसारख्या पर्यटन ठिकाणी केरोनाची तपासणी करूनच यावे,े असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, मुंबईमध्ये नोकरी निमित्त गेलेल्या नागरिकांच्या घरी येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने एसटी स्टॅंडवरच तपासणी पथक नेमाव,े अशी मागणी करण्यात येत आहे. मुंबई- पुणे या इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शहरातून गावी येणाऱ्या नागरिकांनी याची काळजी घेण्याची गरज आहे अजूनही काही प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता त्यामुळे भासत आहे.





