Wai News : वाई मतदारसंघात मकरंद पाटलांना मिळणार ‘वॉकओव्हर’? निवडणुका तोंडावर, पण भोसले गट मैदानात शांत

प्रभात वृत्तसेवा
सातारा ( मयूर सोनावणे ) – नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. दोन डिसेंबरला मतदान असल्यामुळे चेंडू कमी अन् धावा जास्त अशी अवस्था निर्माण झाली आहे. वाई विधानसभा मतदारसंघातील पाचगणी, महाबळेश्वर आणि वाई पालिकांच्या निवडणुका होत असून मदत व पुनर्वसन मत्री मकरंद पाटील गटाकडून विजयाचा निर्धार केला जात आहे. तर विरोधी मदन भोसले यांच्या गटाचा अस्तित्व टिकवण्यासाठीही कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मकरंद पाटील यांनी फक्त वाई तालुकाच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात आपली सत्तास्थाने बळकट केली आहेत. आबांची सत्तास्थाने बळकट होत असताना आपोआपच माजी आमदार मदन भोसले यांचा विधानसभा मतदारसंघातील प्रभाव कमी होत गेला. पालिका निवडणुकांनंतर पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होईल. त्यामुळे मदन भोसले यांच्या गटाला उर्जितावस्था आणण्याची हीच खरी वेळ आहे.
मात्र, सध्याचे मतदारसंघातील वातावरण बघता भोसले गटाकडून तशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. याउलट मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाकडून निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबाधणी गेल्या काही महिन्यांपासूनच सुरु आहे. वाई मतदारसंघात महाबळेश्वर, वाई आणि पाचगणी या तीन नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील गटाने शड्डू ठोकला आहे. परंतु, विरोधकांमधून अद्याप कोणत्याच हालचाली होताना दिसत नसल्याने निवडणुका एकतर्फी होणार का, अशी चर्चा सध्या तरी मतदार सघांत आहे.
दादांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा..
माजी आमदार मदन भोसले गेल्या महिन्यांमध्ये, नव्हे तर गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. मात्र, सध्या होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मदनदादांनी निवडणुकांसाठी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षा त्यांच्या गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
सुरभीताईची एकाकी धडपड..
विरोधक कितीही मोठा असला तरी स्वत:ला कमी न समजता लढायचं असा निर्धार मदनदादा भोसले यांच्या कन्या सुरभीताई भोसले यांच्या धडपडीमधून पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील रखडलेल्या तसेच न झालेल्या आणि आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी आवाज उठविण्याचे काम सुरभीताई भोसले यांच्याकडून होताना दिसत आहे. मात्र, सुरभीताईची सुरु असलेली ही एकाकी धडपड संपूर्ण गटाची मंदावलेली गती वाढवेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





