Wai News: आई हंबरते… लेकरू मात्र बेपत्ता! वाई तालुक्यात दुधाच्या लालसेने माणुसकी वेशीवर टांगली
Wai News: वाई तालुक्यातील ग्रामीण भागात नवजात वासरांना रस्त्याच्या कडेला आणि माळरानावर सोडल्याची घटना; अन्नाविना अन् कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पाप जिवांची तडफड.

Wai News- आईच्या कुशीत जन्म घेतल्यानंतर तिच्या दुधावर जगण्याचा पहिला हक्क असलेल्या नवजात वासरांची जन्मानंतर अवघ्या काही तासांतच आईपासून ताटातूट करून त्यांना रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर, माळरानावर अथवा निर्मनुष्य ठिकाणी सोडून देण्याचा संतापजनक प्रकार वाई तालुक्यातील काही ग्रामीण भागात होत असल्याचे समोर येत आहे. केवळ वासराने दूध प्यायल्याने दूध विक्रीवर परिणाम होतो,
या आर्थिक स्वार्थातून निष्पाप मुक्या जीवांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ढकलले जात असल्याचे विदारक चित्र आहे. आई हंबरते… लेकरू मात्र बेपत्ता! आईपासून दूर केलेले ते वासरू भुकेने व्याकूळ होऊन इकडे-तिकडे भटकत राहते. दुसरीकडे आपल्या लेकराचा शोध घेत गाय सतत हंबरत राहते. आईच्या डोळ्यांसमोर तिचे बाळ हिरावून घेण्याची ही वेदना शब्दांत व्यक्त करता येत नसली तरी ती पाहणार्या संवेदनशील माणसाचे काळीज पिळवटून निघते.
ज्या वयात वासराला आईच्या उबेत विसावण्याची आणि आईचे दूध पिऊन जगण्याची गरज असते, त्याच वयात त्याला उपासमार, भटकंती आणि असुरक्षिततेच्या वाटेवर ढकलले जाते. रस्त्यावर आलेली अनेक वासरे वाहनांच्या धडकेत जखमी होतात. काही अन्न-पाण्याअभावी तडफडतात, तर काही मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडतात. पाऊस, कडाक्याचे ऊन, थंडी, मुंग्या आणि इतर संकटांमुळे त्यांच्या हालअपेष्टांत आणखी भर पडते.
दूध हवे; पण वासराचे काय?
दूधासाठी गाय हवी, तिचे दूध विकून आर्थिक उत्पन्न हवे; मात्र त्या दुधावर पहिला नैसर्गिक हक्क असलेल्या वासराचे काय? हा प्रश्न आता केवळ पशुप्रेमींचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा घेणारा आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी जन्माला आलेल्या जीवाला रस्त्यावर अथवा ओसाड ठिकाणी सोडून देणे ही बाब माणुसकीलाच काळिमा फासणारी आहे. ग्रामपंचायती, पशुसंवर्धन विभाग, गोशाळा, सामाजिक संस्था, पशुप्रेमी आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास अनेक मुक्या जीवांचे प्राण वाचू शकतात.
वासरांना करुणा गोशाळेत आणून द्या!
दुष्काळामुळे चारा-पाण्याची अडचण होत असेल किंवा नवजात वासरांचा सांभाळ करणे शक्य नसेल, तर त्यांना रस्त्यावर अथवा ओसाड ठिकाणी सोडू नका. अशा असहाय्य जनावरांना करुणा गोशाळेत आणून द्यावे. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी आम्ही स्वीकारू. मुक्या जीवांच्या जगण्याची जबाबदारी समाजाने स्वीकारावी, हीच अपेक्षा आहे.
– राकेशशेठ ओसवाल, ट्रस्टी, करुणा गोशाळा.






