Wai Municipal Election : वाई नगरपरिषद निवडणूक! नगराध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी ; सत्तेसाठी रस्सीखेच सुरू

प्रभात वृत्तसेवा
भुईंज – वाई नगरपालिकेची २०२५ ते २०३० पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या अगोदरच वाई शहरातील सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या अंगात खुर्चीचे वारे जोरात संचारले आहे. त्यातच नगराध्यक्षपद खुले पडल्याने निवडणुकीच्या आधीच शहरात व सोशल मीडियावर सर्वपक्षीय इच्छुकांचे पोस्टर झळकल्याने यंदा वाईच्या सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी चांगलीच रस्सीखेच वाईकरांना पहायला मिळणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचा करिष्मा दिसणार की भाजप, शिवसेना इतर मित्रपक्ष पुरस्कृत जनकल्याण आघाडी झेंडा रोवणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
आतापर्यंत वाई नगरपरिषद निवडणूक प्रामुख्याने राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना इतर मित्रपक्ष पुरस्कृत जनकल्याण आघाडी या परंपरागत दोन विरोधी आघाडीमध्ये पहायला मिळाली आहे. मूळ राष्ट्रवादी,शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडून सध्या महायुतीचे सरकार राज्यात अस्तित्वात आहे. परंतु वाई तालुक्यातील अंतर्गत धूसफुसीचे राजकारण पहाता तिन्ही पक्षाच्या सर्व वरिष्ठानी किती जरी ठरवलं तरी स्थानिक पातळीवरील निवडणूका एकत्रितपणे होतील याची शक्यता नाही. त्यामुळे राष्ट्रवादी (अ.प.गट)पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना (शिंदे गट) व मित्रपक्ष जनकल्याण आघाडीमध्येच आमने सामने लढत पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेली दोन-तीन दशके वाई – खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील सर्व स्वायत्त संस्थांच्या सत्तेच्या चाव्या मंत्री मकरंद पाटील यांच्या हातात जनतेने दिलेल्या पहाता येत्या काळात वाई नगरपालिका निवडणुकीत त्यांचाच करिष्मा पाहायला मिळणार असल्याची भविष्यवाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.तर दुसरीकडे राज्यातील मुख्य सत्ताधीश भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या सोबतीला कदाचित आरपीआय पक्ष व राष्ट्रवादी नाराज कार्यकर्त्यांना बरोबर घेवून वाई नगरपरिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या गोटात सत्तेची ऊर्जा संचारलेली आहे.
असे असले तरी वाई तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्ष, आरपीआय आंबेडकर गट हे स्वतःचा सवता सुभा मांडणार का? आपली सर्व ताकद इतर कोणाच्या बाजूने उभे करणार हे येणारा काळ ठरवेल.गत निवडणुकीत तीर्थक्षेत्र आघाडीने बहुमत प्राप्त करूनही थेट जनतेतून नगराध्यक्षाच्या निवडीत वाईकर जनतेने अवघ्या एकमताचा कौल जनकल्याण आघाडीच्या पारड्यात टाकल्याने मुख्य खुर्चीच्या चाव्या भाजप प्रणित जनकल्याण विकास आघाडीच्या ताब्यात गेल्या होत्या. परंतु, तत्कालीन थेट नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसातच थकीत बिलापोटी लाच स्वीकारताना लाचलुचपत जाळ्यात अडकल्याने वाई शहराची ‘प्रतिमा’ व “प्रतिभा” डागळली होती.
त्यामुळे सत्तेच्या चाव्या जनकल्याण विकास आघाडीच्या हातात येऊन ही वाई शहराचा पाच वर्ष कारभार तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडेच राहिल्याने मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी वाई शहराच्या विकासासाठी आला.ऐन निवडणुकीच्या तोंडावर विजयाची ऊर्जा संचारलेल्या भाजपात मूळ जुना भाजप व नवीन भाजप यांच्यात वरकरणी दिसणारी एक वाक्यता अंतरंगात मात्र अजून तरी एकसंघ नाही.
याचा फायदा नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडी घेण्याच्या तयारीत असली तरी किसनवीरच्या पराभवाचा वाचपा काढण्याची नामी संधी जनकल्याण आघाडीच्या नेत्यांना वाई नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे. तीर्थक्षेत्र व जनकल्याण आघाडी येत्या निवडणुकीत अस्तित्वात येतील किंवा नाही? हे सध्या सांगता येत नसले तरी वाईकरांना सुसंस्कृत, भ्रष्टाचारमुक्त,विकसनशील चेहरा पाहिजे तो शोधण्याची कसरत दोन्ही विकास आघाडयांना करावी लागणार आहे.
डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या झंझावातामुळे चुरस..
डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या झंझावाता मुळे निवडणूक चुरशीची होणार वाई शहरात डॉ. सुरभीताई भोसले यांनी गत पाच वर्षांत जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कामे करत असताना त्यांची लोकांशी नाळ जोडली गेली आहे. सर्व सामान्यांचे कोणतेही काम असो ते काम त्वरित ॲक्शन घेऊन सोडवणूक केली आहे. त्यामुळे गत नगरपरिषदेची निवडणूक विरोधकांना अडचणीची जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.





