Wai Crime News: वाई शहरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री ७ दुकाने फोडली; पोलिसांना थेट आव्हान
Wai Crime News: जुन्या चोऱ्यांचा तपास अपूर्ण असतानाच पुन्हा मोठी चोरी; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा पत्रकार आणि नागरिकांचा आरोप.

Wai Crime News – शहरातील यशवंतनगर परिसरात 13 तारखेच्या मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल सात दुकाने फोडल्याने शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी चोरटे हातात कोयते घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने वाई शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका रात्रीत सात दुकानांना लक्ष्य करून चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
वाई शहर आणि बाजारपेठेत यापूर्वीही अनेकदा दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेल्याच्या तक्रारी झाल्या; मात्र अनेक गुन्ह्यांतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याची नागरिकांची भावना आहे. सोन्याच्या चोरीच्या प्रकरणांमध्ये किती मुद्देमाल चोरीला गेला आणि त्यापैकी किती हस्तगत झाला, याबाबतही पोलिसांनी स्पष्ट माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी होत आहे.
जुन्या गुन्ह्यांचा तपास तातडीने मार्गी लावून आरोपींना गजाआड करावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. गुन्हे घडूनही त्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याची भावना स्थानिक पत्रकार आणि नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी वाई पोलीस ठाणे आणि डीबी पथकाच्या कार्यपद्धतीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी हे या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जातात, चोरट्यांना किती लवकर गजाआड करतात आणि वाई शहरातील व्यापारी व नागरिकांच्या मनातील भीती किती लवकर दूर करतात, याकडे संपूर्ण वाई शहराचे लक्ष लागले आहे.





