Pune crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; पतीला अटक
Pune crime : वाघोलीत माहेराहून पैसे आणण्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून ३३ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. लोणीकंद पोलिसांनी पतीला अटक केली.

Pune crime : माहेराहून पैसे आणण्यासाठी पती आणि सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळून ३३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली येथील बकोरी रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीला अटक केली असून, सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमृता राहुल वाघमारे (वय ३३, रा. बकोरी रस्ता, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती राहुल शिवाजी वाघमारे (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अमृता यांच्या आईने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अमृता यांचा राहुल याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर पती आणि सासूकडून माहेराहून पैसे आणण्याची मागणी करून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अमृताने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पती राहुल वाघमारे याला अटक केली असून, सासूविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.





