Pune District : आळेफाटा परिसरात गणरायाचे आगमन
Pune District : आळेफाटा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व सहायक पोलीस निरीक्षक बळीराम घंटे यांच्या हस्ते विधिवत श्रींची पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

आळेफाटा : डोक्यावर भगवी टोपी, कपाळी अष्टगंध आणि मुखी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत हातात गणरायाची सुबक मूर्ती घेऊन निघालेले भाविक… ढोल-ताशा आणि सनईच्या तालावर रंगलेला उत्साह… अशा अत्यंत मंगलमय व भक्तिमय वातावरणात आळेफाटा व जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सर्व मांगल्याचे प्रतीक असलेल्या श्री गणेशाची घरोघरी व सार्वजनिक मंडळांत उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.
आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणे, बेल्हे, साकोरी, राजुरी, आळे, वडगाव-आनंद, पिंपळवंडी, बोरी-बुद्रुक, नळावणे, पेमदारा आदी २२ गावांमध्ये एकूण १९१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि एका खासगी मंडळाने गणेशमूर्तीची स्थापना केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली. आळेफाटा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व सहायक पोलीस निरीक्षक बळीराम घंटे यांच्या हस्ते विधिवत श्रींची पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
बेल्हे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गावातील गणपती मंदिरात सायंकाळी पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या हस्ते श्रींची स्थापना करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अशोक घोडके यांनी दिली. श्रीराम चौक येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या श्रीराम गणेशोत्सव मंडळाने फळविक्री सोसायटीच्या आवारात गणपतीची स्थापना केली असल्याचे अध्यक्ष अहमद मौलवी यांनी सांगितले. राजुरी येथे धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अध्यक्ष माऊली शेळके यांच्या हस्ते झाली. यंदा या मंडळाच्या वतीने डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय संत रोहिदास मंडळ, जगदंबा मंडळ, मोरया गणेशोत्सव मंडळ, इंदिरानगर रहिवासी मंडळ, पिळणवस्ती, राजे उमाजी नाईक मित्र मंडळ, टेम्भी मळा गणेशोत्सव मंडळाने दुपारी दोन वाजेपूर्वी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
एक गाव एक गणपती संकल्पनेला तडे
बेल्हे, राजुरी, आळे, मंगरूळ, साकोरी, आणे, नळावणे, पेमदारा, उंचखडक, शिंदेवाडी, बोरी-बुद्रुक, वडगाव-आनंद, पिंपळ वडी, रानमळा, चाळकवाडी, गुंजाळवाडी, बांगरवाडी, गुळुंचवाडी, यादववाडी, तांबेवाडी, कोंबरवाडी, सुरुकुलवाडी परिसरात गणेशोत्सव मंडळानी श्री च्या मूर्तीची स्थापना केली. म्हस्केवाडी वगळता बेल्हे परीसरात एक गाव एक गणपतीया संकल्पनेला यावर्षी गणेश भक्तांनी तिलांजली दिली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.





