Wagholi Traffic Police : वाघोलीत अवजड वाहतूक कारवाईचा अनागोंदी कारभार उघड
Wagholi Traffic Police : वाघोलीत अवजड वाहतूक कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे.

Wagholi Traffic Police : वाघोली येथे अवजड वाहतूक कारवाईमध्ये वाहतूक कर्मचाऱ्यांकडून होत असलेला अनागोंदी कारभार सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्या समोर २१ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी स्वतः हजर राहून पुराव्यानीशी उघड केला आहे.
वाघोली व लोणीकंद येथील दोन युवकांच्या अवजड वाहतूक वाहनावर वाघोली वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांच्या आदेशाने वजन करून त्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाकडे ११ फेब्रुवारी रोजी सादर करून वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली.
या कारवाईत वाघोली वाहतूक शाखेच्या समोरील जागेत जवळपास ९ दिवस वाहने उभी होती. सदर दोन वाहनांची कारवाई प्रक्रिया १८ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. दोन्ही वाहनांचा दंड लाखमोलाचा ठरला आहे.
याच कालावधीत एका अवजड वाहनावर १७ फेब्रुवारी रोजी वाघोली वाहतूक शाखेच्या वतीने १५०० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली आहे. मात्र याच कारवाईत अवजड वाहन दाखवू नये यासाठी वाहनचालक प्रतिनिधीकडून वेगळे वाहतूक पोलिसाने २७ हजार ५०० रुपये घेऊन वाहन सोडण्यात आले आहे. असा पुराव्यानीशी खुलासा सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर यांचे समोर पैसे देण्याऱ्या संबंधित व्यक्तींने हजर राहून कारवाईतील आर्थिक तडजोडीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
त्यावेळेस जवळपास वाहन क्षमतेपेक्षा १० टन जादा ही बाब असताना देखील अवजड वाहन दाखवू नये यासाठी पोलिसांनी पैशाची मागणी करून बळजबरीने वेगळे पैसे घेऊन वाहन सोडण्यात आल्याची कबुली दिल्याने कारवाईत अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





