वाघोली : ग्रामसेवकाकडून एका ज्येष्ठ नागरिकास माहिती देण्यास टाळाटाळ; चार ओळींच्या माहितीसाठी दोन महिन्यांच्या कालावधी…

वाघोली – ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चार ओळींच्या माहितीसाठी मिळवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लोटला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडून एका ज्येष्ठ नागरिकास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला आहे.
वाडेबोल्हाई येथील एका ज्येष्ठ नागरिकाने 28 मार्च 2024 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मागितली होती. ही माहिती दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर संबंधित माहिती अधिकार ज्येष्ठ नागरिकाला मिळाली आहे. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकाने प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केल्यानंतर 3 जून 2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास अपिलाची सुनावणी ठेवण्यात आली होती.
या सुनावणीस यशदा येथे प्रशिक्षणास असल्याचे तोंडी ग्रामसेवक यांनी माहिती दिल्याने या सुनावणीस अनुपस्थित असल्याचा शेरा विस्तार अधिकारी यांनी अपिलाच्या उपस्थिती पत्रात मारला होता. संबंधित ग्रामसेवकांनी २८ मार्च २०२४ रोजी मागवलेली माहिती दि. २७ मे २०२४ चे जावक क्रमांक असलेले चार ओळीचे माहितीचे पत्र दि. ५ जून रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित जेष्ठ नागरिकाला त्याच्या घरी पाठवले आहे.
ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या समोर हाकेच्या अंतरावर राहत असलेल्या व्यक्तीला चार ओळींच्या माहितीसाठी माहिती मिळवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लोटला असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
“२७ मे २०२४ रोजी माहिती तयार करून संबंधित नागरिकास माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यास सांगितली होती. ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दि. ५ मे २०४ रोजी दिली आहे.” – संतोष भोसले ग्रामसेवक, वाडेबोल्हाई.





