वाघोली : दौंड येथील कला केंद्रावरील गोळीबार प्रकरणाशी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचा संबंध जोडून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय उरुळी कांचन, रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांतही कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. दौंड येथील गोळीबार प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्यानंतर काही विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचे नाव जोडून खोटी पोस्ट व्हायरल केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षात या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसताना बदनामी झाल्याने अनंता कटके यांनी वाघोली पोलिस ठाण्यात रविकांत वर्पे, अनिल जगताप, विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांनीही विविध पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात दुसऱ्या एका आमदार आणि त्यांच्या बंधूंचे नाव समोर आले आहे. अनंता कटके यांनी याबाबत सांगितले की, “आमदार माऊली कटके आणि माझी बदनामी करण्याचा समाजकंटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. याविरोधात तक्रार दाखल केली असून, लवकरच १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कोणीही अशा प्रकारे बदनामी करू नये.”