Wagholi News | गणेश आरत्या ते बॅनरबाजी ; वाघोलीत उमेदवारांची जनसंपर्क मोहीम सुरू

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने होते. तशीच सुरुवात वाघोली मध्ये अनेक राजकीय मंडळींनी गणेश उत्सव मंडळांना भेटी देऊन करण्यास सुरुवात केली आहे.वाघोलीचे विभाजन होऊन खराडी चंदन नगर तसेच विमान नगर लोहगाव अशा दोन भागांना जोडणारे दोन प्रभाग झाले आहेत. वाघोली चे विभाजन झाल्यानंतर सध्या प्रभाग रचनेवर काही प्रमाणात हरकती नागरिकांनी नोंदवल्या आहेत.
मात्र राजकीय मंडळींनी मतदारांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उज्जैन यात्रा, अयोध्या यात्रा, गाठीभेटी, गणेश मंडळाच्या आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती, देणगी रूपाने तसेच विकास कामांच्या माध्यमातून, बॅनर बाजी मधून आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. अनेक इच्छुकांचे गल्लोगल्ली बॅनर लागले आहेत.
याशिवाय वाघोली परिसरातील इच्छुकांचे खराडी चंदन नगर, विमान नगर, लोहगाव परिसरात बॅनर तर तिकडच्या परिसरातील इच्छुकांचे वाघोली परिसरात बॅनर लागले आहेत. गणेश मंडळांना भेटी देण्यात पुढार्यांची सध्या धावपळ पहावयास मिळत आहे. प्रभाग रचनेत वाघोलीचे विभाजन झाले असले तरी दोन्ही प्रभागांमध्ये वाघोलीच्या इच्छुक उमेदवारांच्या नातेवाईक, मित्रपरिवार, पक्ष संघटना, तसेच राजकीय प्राबल्य व निवडून येण्यासाठी वैयक्तिक जनसंपर्क या गोष्टी प्रभावी ठरणार असून वाघोलीत सध्या गणेश उत्सव, नवरात्र व दीपावली सण मोठ्या थाटात साजरे होणार हे मात्र सिद्ध झाले आहे.
आजी माजी आमदारांची वाघोलीवर नजर..
आमदार राहुल कुल, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार माऊली कटके, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक या पाचही आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये जनसंपर्काची मोहीम हाती घेतली आहे. आगामी होणार्या निवडणुकांमध्ये या पाचही आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय प्राबल्य सिद्ध करण्यासाठी मोठी चढाओढ दिसून येत आहे.
वाघोलीचे नेते अॅक्टिव्ह मोडमध्ये..
वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील, माजी उपसरपंच शांताराम कटके, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सातव, माजी उपसरपंच समीर भाडळे, अनिल सातव पाटील,
माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच संजय सातव पाटील, मीना सातव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, विक्रम वाघमारे, संपत गाडे, माजी उपसरपंच संदीप सातव, प्रकाश जमदाडे, विजय जाचक, गणेश गोगावले, सुनील जाधवराव, जयप्रकाश सातव पाटील, बाळासाहेब सातव पाटील, आदी मान्यवरांनी भेटीगाठींवर भर दिला आहे.





