Wagholi Crime – वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील रेमंड स्कूलसमोर गारवा हॉटेलजवळ मंगळवारी (दि. ३) सायंकाळी सहाच्या सुमारास टोळक्याने एका युवकास जबर मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर येथील स्वप्नील कांबळे हे मित्र राजू जगधने व दर्शन गवाले यांच्यासह वाहन आणण्यासाठी जात होते. त्यावेळी वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील रेमंड स्कूलसमोर गारवा हॉटेलजवळ काही जण एकाला मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन थांबविले असता मारहाण करणाऱ्यांनी “आम्हाला मारायला आला आहे का?” असे म्हणत स्वप्नील कांबळे यांना शिवीगाळ केली व राजू जगधने यांना मारहाण केली. तिघे पुढे निघून गेल्यानंतर परत येत असताना संबंधित चौघांनी राजू जगधने यांना अडवून पुन्हा जबर मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी राजू जगधने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मारहाण करणाऱ्यांची नावे चंद्रकांत फटांगे, राज नितनवरे, ओमकार ससाणे व अथर्व येवले अशी असल्याचे समजते. याप्रकरणी संबंधित चौघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.