Wagholi : वाघोलीतील बकोरी रोडवरील अतिक्रमणे हटवली; महापालिकेची धडक कारवाई
Wagholi : पुणे महापालिकेने वाघोलीतील बकोरी रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई केली. पथारी, हातगाड्या, शेड्स आणि अनधिकृत जाहिरात फलक हटवले.

Wagholi : पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (दि. २१) वाघोलीतील बकोरी रोड परिसरात अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. नगररोड-वाघोली आणि येरवडा-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली.
महापालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम, आकाशचिन्ह, आरोग्य आणि विद्युत विभागांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. यावेळी रस्ते व पदपथांवरील अनधिकृत पथारी, हातगाड्या, व्यावसायिक शेड्स तसेच विनापरवानगी लावलेले फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरात फलक हटवण्यात आले.
नागरिकांना रस्त्यांवरून सुरक्षितपणे जाता यावे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, हा या मोहिमेचा उद्देश आहे. शहरातील अतिक्रमणांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.





