Wagholi Suicide News : वाघोली परिसरातील मॅजेस्टिक ओयसिस या उंच इमारतीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने आठव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वाघोली पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सारा अंधारे (२०) ही मॅजेस्टिक ओयसिस बिल्डिंगच्या ‘ए’ विंगमध्ये राहत होती. दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास तिने आठव्या मजल्यावरील रिफ्युजी एरियामधून खाली उडी मारली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तात्काळ लाईफ लाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, सारा हिने करमाळा येथे इयत्ता अकरावीचा फॉर्म बाहेरून भरला होता. घटनेच्या वेळी तिची आई आणि बहीण घरी उपस्थित होत्या. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे