प. बंगालच्या हुगळीतून दीदी नंबर १ रिंगणात; ‘रचना बॅनर्जी’ यांना उमेदवारी जाहीर

कोलकाता – प. बंगालमध्ये खरी लढत भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन पक्षांतच होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या इर्षेने भाजप रिंगणात उतरला आहे तर विधानसभेप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही भाजपला मात देण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सरसावल्या आहेत. अशात येथील हुगळी मतदारसंघातील लढत अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. त्याचे कारण येथे दोन स्टार परस्परांना पराभूत करण्यासाठी उभ्या ठाकल्या आहेत.
हुगळी मतदार संघात भाजपच्या लॉकेट चटर्जी विद्यमान खासदार आहेत. तर तृणमूलने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो च्या होस्ट रचना बॅनर्जी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारांची निवड करताना जातीच्या समीकरणाचाही विचार करण्यात आला आहे. रचना बॅनर्जी बंगालमध्ये दीदी नंबर १ नावाने लोकप्रिय आहेत.
अनेक वर्षांपासून त्या हा शो होस्ट करत आहेत. ३ मार्च रोजी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या या कार्यक्रमात आल्या होत्या. तेंव्हापासूनच रचनाही राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर झालेल्या तृणमुलच्या रॅलीतही रचना यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे याच रॅलीत तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रचना यांच्या नावाची घोषणा केली होती.
४९ वर्षीय रचना बॅनर्जी या मिस कलकत्ता राहील्या आहेत. त्यांचे मुळ नाव झूमझूम बॅनर्जी आहे. नंतर त्यांनी रचना असे नामकरण करून घेतले. बंगाली, उडिया, तेलगु, तमिळ, कन्नड अशा बहुतेक भाषांमधील चित्रपटांत त्यांनी काम केले असले तरी मोठ्या पडद्यावर त्यांना फारसे यश लाभले नाही.छोट्या पडद्यावरच्या एका कार्यक्रमाने मात्र त्यांनी लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित केले.
हुगळीतून २००९ आणि २०१४ मध्ये तृणमूलच्या डॉ. रत्ना डे विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये मात्र भाजपच्या लॉकेट चटर्जी यांनी त्यांचा पराभव केला. ७३ हजार मतांनी त्या विजयी झाल्या होत्या. अर्थात लॉकेट अभिनेत्री असल्यातरी त्यांना राजकारणाचा पूर्वानुभव होता. मात्र आता त्यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या रचना बॅनर्जी यांना कोणताही पूर्वानुभव नाही. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसची आतापर्यंत वाटचाल पाहता त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत आतापर्यंत अनेक कलाकारांना संधी दिली आहे.





