Romania : रोमानियामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान

बुकारेस्ट (रोमानिया) – रोमानियामध्ये आज अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुक घेण्यात आली. गेल्या वर्षी अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. मात्र निवडणुकीतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती.
आज झालेल्या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. निवडणुकीतील विजयी उमेदवार १८ मे रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकरण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीतल्या गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नाचक्की झाली होती. या निवडणुकीत उति उजव्या कालिन जॉर्जेस्क्यू यांनी पहिल्या फेरीमध्ये आघाडी घेतली होती.
त्यानंतर या निवडणुकीमध्ये रशियाने मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. या आरोपांमुळे रोमानियातल्या सर्वोच्च न्यायालयाने ही निवडणूक प्रक्रियाच रद्द करून टाकली. रशियाने मात्र या निवडणूकीतील हस्तक्षेपाचे आरोप फेटाळून लावले होते.
रोमानियामध्ये इतर देशांप्रमाणे महागाई, मोठी वित्तीय तूट आणि अर्थकारणातील मंदी हे प्रमुख प्रचाराचे मुद्दे आहेत. कट्टर उजव्या विचारसरणीचे जॉर्ज सिमोन हे मुख्य दावेदार आहेत. त्यांना बुकारेस्टचे महापौर निकोसर डान यांचे आव्हान आहे. याशिवाय क्रीन ऍन्टोनेस्क्यू यांना काही पक्षांच्या आघाडीने उमेदवारी दिली आहे.





