Satara: विधान परिषदेसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान
Satara जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 47 हजार 463 आणि शिक्षक मतदारसंघासाठी नऊ हजार 454 मतदारांची नोंद झाली होती. मतदानासाठी अनुक्रमे 93 आणि 44 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

Satara: विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. शिक्षक मतदारसंघासाठी 89.39 टक्के, तर पदवीधर मतदारसंघासाठी 66.92 टक्के मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील 137 मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 47 हजार 463 आणि शिक्षक मतदारसंघासाठी नऊ हजार 454 मतदारांची नोंद झाली होती. मतदानासाठी अनुक्रमे 93 आणि 44 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी पहिल्या दोन तासांमध्ये पदवीधरसाठी 24 टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी 32 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला. 2 वाजेपर्यंत शिक्षक मतदारसंघासाठी 59 टक्के मतदान झाले. सातारा शहर परिसरातील मतदान केंद्रांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भेटी दिल्या.
दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावल्याने, निकालाची उत्सुकता आहे. शिक्षक मतदारसंघात प्रा. सचिन सानप यांनी केलेली बंडखोरी आणि त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिळालेला पाठिंबा यामुळे महायुतीसमोरील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव या डॉ. स्मिता जाधव यांना कडवी टक्कर देतील, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.





