चंद्रपूर – देशात 96 मतदारसंघासह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पडली आहे. विशेष म्हणजे तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज चौथ्या टप्प्यात सुरू असलेल्या मतदानावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदारांनी 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रासाठी पहिल्या टप्प्यात झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही मतदान केले होते. त्यामुळे महिनाभरात लोकसभेच्या निवडणुकीत दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील बारा गावे तेलंगणा सीमेला लागून आहेत. या गावांवर तेलंगणा राज्य अधिकार सांगत असले तरी ही गावे महाराष्ट्रात आहेत. या बारा गावात एकूण 5 हजार 117 मतदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार म्हणून घोषित केले आहे. त्यांना मतदार ओळखपत्रं दिली आहेत. येथील प्रत्येक ग्रामस्थाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आहेत. आज तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, जिवती या दुर्गम तालुक्यातील मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापुर, इंदिरानगर, येसापुर, पलसगुडा, भोलापठार आणि लेंडीगुडा अशी या गावांची नावे आहेत.