Voter List Revision: मतदार यादीतून तुमचे नाव गायब होणार? अपूर्ण पत्त्यांमुळे तब्बल ५० लाख मतदारांसमोर मोठे संकट
Voter List Revision: वेळेत गणना अर्ज न भरल्यास नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता; नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी मतदारांना द्यावी लागणार सुनावणी.

Voter List Revision – मतदार यादीमधील पत्ते अपूर्ण असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ९० लाख ८० हजार मतदारांपैकी केवळ ३९ लाख ३३ हजार मतदारांनाच गणना अर्ज वाटण्यात आले आहेत. एकूण मतदारसंख्येच्या हे प्रमाण केवळ ४३ टक्केच आहे. हे अर्ज संकेतस्थळावर अपलोड करण्याचे प्रमाणही केवळ नऊ टक्के आहे. त्यामुळे पुढील पंधरा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओंना उर्वरित ५० लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान असणार आहे.
जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, या मोहिमेत प्रत्येक मतदाराला स्वतंत्र गणना अर्ज देण्याचे काम येत्या २९ जुलैपर्यंत करायचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३९ लाख ३३ हजार ५५८ मतदारांना गणना अर्ज दिले आहेत. कामाचा व्याप आणि अडचणी लक्षात घेता, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बीएलओंकडून होत आहे.
ज्या मतदारांकडून वेळेत गणना अर्ज भरून घेतले जाणार नाहीत, अशा मतदारांना प्रशासनातर्फे स्थलांतरित म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मतदारांना सुनावणीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, तसेच योग्य कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेजारीही ओळखत नाहीत.
या मोहिमेतील अडचणींबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एका बीएलओने सांगितले, की अनेक मतदारांचे पत्ते अपूर्ण आहेत. अशा मतदारांना आजूबाजूचे इतर मतदारही ओळखत नाहीत, तसेच त्यांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे अशक्य झाले आहे. सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात मतदारांना या मोहिमेची पुरेशी कल्पना नसल्याने प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता राजकीय पक्षांकडून आवाहन केले जात असल्याने मतदारांचा प्रतिसाद वाढला असून, अर्ज वाटपाचा वेग वाढेल, अशी आशा आहे.





