Jejuri News : जेजुरी वारकरी दिंडी अपघाततात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; तीन गावांवर शोककळा
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला जेजुरी येथे भीषण अपघाताने ग्रासले असून, या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Jejuri News : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला जेजुरी येथे भीषण अपघाताने ग्रासले असून, या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकच्या धडकेने झालेल्या या अपघाताने संपूर्ण मिरज तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मृत्युमुखी पडलेल्या महिला वारकऱ्यांमध्ये मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, मालगाव आणि कवलापूर या गावांतील रहिवाशांचा समावेश आहे. नंदा पवार (वय ६०), माधवी राजाराम सलगरे (वय ५५) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५) अशी मृत महिला वारकऱ्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तिन्ही गावांमध्ये शोकसागर उसळला असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गावबंद पाळत मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.
कसबे डिग्रज येथील संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडीतून १५० हून अधिक वारकरी दि. ६ जुलै रोजी आळंदीकडे प्रस्थान करते झाले होते. आजचा दिंडीचा पाचवा दिवस असताना, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या याच दिंडीवर काळाने घाला घातला आणि आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकांतिकेत झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने तात्काळ व भरघोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी कसबे डिग्रज येथील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.





