Water cut cancelled: पुण्यात २२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द
Water cut cancelled:

महापौर मंजुषा नागपुरे; आढावा घेऊन पुढील निर्णय
Water cut cancelled: आजपासून सुरू होणारी पाणीकपात रद्द करण्यात आली असून, २२ जुलैपर्यंत ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर पाऊस, धरणसाठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर उपस्थित होते.
१५ जूनपासून पुण्यात पाणीकपातीला सुरुवात झाली. एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. शहरात पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ७ जुलैपासून पाणीकपात रद्द करून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, १२ जुलैपर्यंतच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पाणीकपात पुन्हा नियोजनानुसार सुरू करण्यात येणार होती.
त्याविषयी महापालिका आयुक्तांना सोमवारी विचारले असता, येत्या १५ जुलैपासून पुन्हा एकदा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, धरणात असलेला पाणीसाठा आणि कॅनाॅलमध्ये सोडले जाणारे पाणी या सगळ्याचा विचार करता येत्या २२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द करण्यात आल्याची घोषणा नागपुरे यांनी केली.
धरणसाखळीमध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्या वेळी धरणात होणारा पाण्याचा येवा पाहून निर्णय घेण्यात येईल, असे नागपुरे म्हणाल्या. पाऊस चांगला झाला आणि धरणसाठा वाढला, तर कपात करण्याचा प्रश्नच उरत नाही. २२ जुलैनंतर हवामान विभाग (आयएमडी), पाटबंधारे विभाग यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, असे नागपुरे यांनी नमूद केले.





