Election Commission : ‘मत चोरी खपवून घेतली जाणार नाही..’; निवडणूक यंत्रणेवरील ताब्याविरुद्ध आवाज तीव्र
निवडणूक यंत्रणेवर कथित ताबा मिळवल्याच्या विरोधात आवाज तीव्र होत असल्याचे काँग्रेसने गुरुवारी म्हटले आणि दावा केला की, नागरिक आता कोणत्याही स्वरूपातील मत चोरी खपवून घेणार नाहीत.

Election Commission – निवडणूक यंत्रणेवर कथित ताबा मिळवल्याच्या विरोधात आवाज तीव्र होत असल्याचे काँग्रेसने गुरुवारी म्हटले आणि दावा केला की, नागरिक आता कोणत्याही स्वरूपातील मत चोरी खपवून घेणार नाहीत.
काँग्रेसचे सरचिटणीस (प्रसारमाध्यमे विभाग) जयराम रमेश यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेबाबत माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ दिला. या प्रक्रियेमुळे जवळपास १४ कोटी मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत, असा आरोप रावत यांनी केला.
एका प्रमुख राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी एसआयआर आणि निवडणूक आयोगाकडून झालेल्या नियमांच्या उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रावत यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआर हाताळणीवरही प्रश्न उपस्थित केले आणि असा युक्तिवाद केला की, एकेकाळी गोल्ड स्टँडर्ड (सर्वोत्तम मानक) मानल्या जाणाऱ्या या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला धक्का लागला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क गमावला आहे, असे रमेश म्हणाले.
रमेश पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांची इंडिया आघाडी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. तीन सदस्यांच्या निवडणूक आयोगाच्या पॅनेलमध्ये बहुमत असलेल्या निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी, ज्या निर्णयांशी ते असहमत होते ते निर्णय रद्द करण्यासाठी मतदानाची मागणी करायला हवी होती.
मुख्य निवडणूक आयुक्तांकडे व्हेटोचा (निर्णय रोखण्याचा) अधिकार नसतो. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीने लोकशाही वाचवा अंतर्गत संयुक्त मोर्चे आणि सभांची मालिका जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली.
‘इंडिया’ आघाडीच्या सर्व खासदारांनी ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच, मतदारयादी पुनरावलोकनातील कथित अनियमिततेबाबत चिंता व्यक्त करण्यासाठी आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.





