कोलकाता – ईदच्या निमित्ताने प. बंगालमध्ये आलेल्या कामगारांना राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी वेगळेच आवाहन केले. आले आहात तर मतदान करूनच जा नाहीतर तुमचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल असा सावधगिरीचा इशारा ममता यांनी त्यांना दिला आहे. सोमवारी ज्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होण्याची घटना घडली होती त्या जिल्ह्यात ममता आज आल्या होत्या. त्या दगडफेकीबद्दल न बोलता त्यांनी भारतीय जनता पार्टीलाच फैलावर घेतले. लोक रामनवमीच्या मिरवणुकीत शस्त्रे घेऊन का चालत होते असा सवाल ममतांनी केला. तसेच ही शस्त्रे त्यांना कुणी दिली अशी विचारणाही त्यांनी केली. दगडफेकीत १८ जण जखमी झाले होते तर अन्य ठिकाणी रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या स्फोटात एक महिला जखमी झाली. दरम्यान, बंगालमधील आज पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर बोलताना ममता म्हणाल्या की त्या केंद्र सरकारचा नागरिकत्व दुरूस्ती कायदा अर्थात सीएए लागू करू देणार नाहीत. तसेच त्या एनआरसीचाही विरोध करतील असेही त्यांनी बजावले. जे कामगार ईद साजरी करण्यासाठी प. बंगालमध्ये आले आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय परत जाऊ नये. त्यांनी तसे केले नाही तर त्यांचे नागरिकत्व हिरावले जाईल असा दावा ममतांनी आज एका सभेत बोलताना केला.