Vitthal Rukmini Mandir : पंढरपुरात विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू; तळघरात मिळालेल्या मुर्ती संग्रालयात करणार जतन

Vitthal Rukmini Mandir । Pandharpur – गर्भगृहातील संवर्धनाचे पूर्णत्वास आल्याने भाविकांसाठी रविवारपासून श्रींचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने श्रींची पहाटे नित्यपुजा झाली.
श्रींची नित्यपुजा झाल्यानंतर पदस्पर्श दर्शन रांगेतील बालाजी मनोहर मुंडे व सरस्वती बालाजी मुंडे, रा. मनुर जि. अदीलाबाद या प्रथम भाविकांना श्रींचे पदस्पर्श दर्शन घडवून पदस्पर्श दर्शनाची सुरवात करण्यात आली.
श्रींच्या पुजेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बबन शिंदे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार परिषदेचे सदस्य, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आषाढी यात्रा नियोजनाबाबत सहअध्यक्ष यांच्या दालनात सकाळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत आषाढी यात्रेत भाविकांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये दर्शन रांगेचे व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने करून संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनास दिल्या.
तसेच मंदिरातील संवर्धन काम करतेवेळी हनुमान गेट येथे मिळालेल्या तळघरातील मुर्ती संग्रालयात जतन करून ठेवणे व तळघराच्या ठिकाणी माहितीची कोणशीला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर्शनरांगेतील कायमस्वरूपी पत्राशेडची दुरूस्ती करून नव्याने 2 कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्याचे ठरले.





