शिरूर तालुक्यातील आपटीच्या तरुणाचा ‘रोमानिया’त विठू नामाचा गजर

कोरेगाव भिमा : महाराष्ट्रात सद्ध्या आषाढी वारी मुळे भक्तिमय वातावरण आहे. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पंढरपूरच्या रस्त्यावर गेले काही दिवस आपल्याला हातामध्ये टाळ, खांद्यावर पताका आणि डोक्यावर पांढरी टोपी घातलेले लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करताना दिसत आहेत.
मात्र महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशी रोमानिया या देशात शिरूर तालुक्यातील आपटी गावचा सुपुत्र वल्लभ काळूराम ढगे या युवकाने आपल्या रोमानिया देशांतील सवंगड्यांसोबत विठ्ठल नामाचा गजर केला आहे.
रोमानिया देशात वल्लभ ने गायिलेले अभंग आणि गवळणी सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणत व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
लहान पासून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या युवकाने उच्चशिक्षण घेत नोकरीसाठी परदेशी वास्तव्य केले. ग्रामीण भागातील आपटी सारख्या खेडेगावात शालेय शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वल्लभ ने भारतात आणि भारताबाहेर आपले उच्चशिक्षण पूर्ण केले मात्र उच्चशिक्षण घेत असताना वल्लभने आपला वारकरी संप्रदायाचा वारसा मात्र सोडला नाही.
एकादशीला आपल्या गावातील मंदिरात भजन करणाऱ्या या युवकाने आषाढी वारी दरम्यान परदेशात आपल्या असंख्य मित्र मैत्रिणींसह विठ्ठल नामाचा डंका केल्याने सोशल मीडियावर सद्ध्या वल्लभ हा हिरो झाल्याचे पाहायला मिळत आहे.





