Sinhagad Fort : मित्रांना लघुशंकेसाठी जातो असं म्हणाला अन्….; सिंहगड किल्ल्यावर मोठी दुर्घटना, २४ वर्षांच्या तरुणासोबत काय घडलं?

Sinhagad Fort : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. एका पर्यटक तरुणाचा कड्यावरून पाय घसरून दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी ही धक्कादायक घडना घडली असून अजूनही तरुणाचा शोध लागलेला नाही. या तरुणाचे नाव गौतम गायकवाड वय २४ असं असून तो आपल्या मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहे. सध्या पोलिस आणि बचाव पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे. गौतम गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता. संध्याकाळी मित्रांना लघुशंकेसाठी जातो असं सागून तो काही अंतरावर गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परतलाच नाही, त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, तो सापडला नाही.
शोध कार्याला सुरूवात
या घटनेची माहिती गौतम याच्या मित्रांनी १०० नंबर डायल करून पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पीएसआय दिलीप शिंदे आणि त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. हवेली आपत्ती व्यवस्थापन, मावळा जवान संघटना आणि वनविभागाचे कर्मचारी देखील मदतीसाठी धावून आले. त्याचे शोधकार्याला सुरुवात झाली. मात्र अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही.
सिंहगड परिसरात हळहळ
या घटनेत गौतम याचा निसरड्या जमिनीवरून पाय घसरून खोल दरीत कोसळ्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाने बुधवारी रात्री उशिरापर्यंत गौतमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले. गौतम हा सुखरुप मिळावा यासाठी शर्तीचे प्रयत्न बजाव पथकाकडून केले जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे सिंहगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





