Satara | नेर धरणातून कृष्णामाई माणगंगेच्या भेटीला

दहिवडी, (प्रतिनिधी) – नेर, ता. खटाव येथून माण तालुक्यातील आंधळी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. कृष्णामाई माण गंगेच्या भेटीला आल्याची भावना यावेळी माणवासीयांकडून व्यक्त करण्यात आली.
उर्वरित ३२ गावांचा पाणी प्रश्न निकाली काढल्याशिवाय मी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही, असे आ. जयकुमार गोरे यांनी सांगितले होते. त्याची वचनपूर्ती ७ ऑगस्ट रोजी झाली. सोनिया गोरे यांच्या हस्ते पाणी नेर धरणातून पाणी सोडण्यात आले.
आंधळी धरण पूर्णतः भरून माणगंगा नदी वाहती करण्यामागे हा उद्देश असल्याचे मत आ. गोरेंच्या पत्नी सोनिया गोरे यांनी व्यक्त केले. या सोडण्यात आलेल्या पाण्याच्या माध्यमातून आंधळी धरण पूर्णपणे भरून माणगंगा नदी वाहती होणार असून राजेवाडी तलावापर्यंत नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याची माहिती देऊन हा दिवस भाग्याचा असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
सोनिया गोरे यांच्या हस्ते नेर धरणातून माण तालुक्यातील आंधळी धरणात पाणी सोडण्यात आले. यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, सोमनाथ भोसले, हरिभाऊ जगदाळे, संजय गांधी यांच्यासह आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक आणि महिला ही उपस्थित होत्या.
अरुण गोरे यांनी आ. जयकुमार गोरे यांची दुष्काळी जनतेला पाणी देण्याबाबतची तळमळ बोलून दाखवली. तसेच दुष्काळी माणच्या भेटीला कृष्णामाई उत्साहाने धावत येऊन सर्वांची भागवणार तहान असल्याचे सांगितले. यावेळी माण तालुक्यातील विविध गावांमधून ग्रामस्थ उपस्थित होते.





