Satara | माणमधून रणजितसिंह देशमुख यांंना निवडून आणणार

दहिवडी, (प्रतिनिधी)- काँग्रेसशी पहिल्यापासून एकनिष्ठ असणारे व पक्षाचा वसा- वारसा जपणारे रणजितसिंह देशमुखच माण- खटाव मतदारसंघातून उमेदवार असतील आणि त्यांना निवडूनही आणणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दहिवडी येथील आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे, माजी आ. आर. जे. रुपनवर, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. महेश गुरव, बाबा माने, डॉ. संतोष गोडसे, एम. के. भोसले, विष्णूपंत अवघडे, संजीव साळुंखे, अजितराव पाटील, मधुकर देवकर, राजूभाई मुलाणी इत्यादी उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, माण- खटाव मतदारसंघ कै. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा आहे.
या मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी केले होते. या जनतेची काँग्रेसची जोडलेली नाळ अजून जशीच्या तशी आहे. काँग्रेसच्या मतदारांनी जयकुमार गोरे यांना आमदार केले.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन माण खटावमध्ये शेकडो सिमेंट साखळी बंधारे आम्ही मंजूर केले आणि ते पूर्ण केले. आज वाया जाणारे पाणी बंधाऱ्यामध्ये साठून राहते आणि येथील शेतकऱ्यांच्या विहिरीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध झाले.
आमचे सरकार असताना या मतदारसंघासाठी शेकडो कोटी निधी देऊन देखील येथील आमदाराने पक्ष बदलून आमच्या पाठीत खंजीर खुपसला.
अशा आमदाराला उमेदवारी देऊन मी चूक केली याचा पश्चाताप होतो. आता रणजित देशमुख यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहा, या मतदारसंघात पुन्हा काँग्रेसचा आमदार निवडून आणू, असेआवाहन त्यांनी केले.
निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करून जनतेची पुन्हा दिशाभूल करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेचे आम्ही स्वागत करतो. पण निवडणुकीसाठी दिशाभूल नको. बदलापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून माता बहिणीवर अन्याय करण्याचे काम केले.
सिंधुदुर्गमध्ये सहा महिन्यात शिवरायांचा पुतळा उभा करून भ्रष्टाचारी काम या सरकारने केले. महागाई वाढवून सामान्य जनतेला दुःखाच्या डोहात बुडविले, अशी टीका करुन चव्हाण यांनी अशा सरकारला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा, असे आवाहन केले
रणजित देशमुख बोलताना म्हणाले, हा मतदारसंघ काँग्रेस विचाराचा आहे. इथे काँग्रेसच्या मतांवर आमदार झालेले महारथी स्वार्थापोटी पक्ष बदलतात. अनेक चुकीची कामे करून तावडीतून सुटण्यासाठी भाजपच्या गोटात गेले.
स्वतःला जलनायक समजू नये. खरे जलनायक पृथ्वीराज बाबा आहेत. त्यांच्यामुळेच माण खटावला पाणी मिळाले आहे. येत्या विधानसभेला सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहा. मी कुठेही कमी पडणार नाही असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार मधुकर भावे यांचेही भाषण झाले.





