शाझिया इल्मी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेचा आक्षेप; म्हणाले,”त्या गुन्हेगारांशी आमचा काय संबंध?”

नवी दिल्ली : भाजपाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा नंतर आता भाजपाच्या आणखी एक राष्ट्रीय प्रवक्त्या शाझिया इल्मी या त्यांच्या वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आल्यानंतर झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, शाझिया इल्मी यांच्या एका विधानाला विश्व हिंदू परिषदेनेच तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. तसेच, यासंदर्भात भाजपाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी देखील विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
शाझिया इल्मी यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखावरून विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. या लेखामध्ये इल्मींनी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेवर आक्षेप घेतला आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयाशी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नाही, असेही इल्मी यांनी या लेखात म्हटले आहे. मात्र, विश्व हिंदू परिषदेला खरा आक्षेप त्यानंतरच्या उल्लेखावर आहे. बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचा सत्कार करणारे विश्व हिंदू परिषदेचे लोक होते, असा दावा इल्मींनी या लेखात केला आहे.
..As a former journalist,activist and now as a Spokesperson, my stand on Kashmiri pandits,reforms in the Muslim community, Killing of RSS workers in WB and Kerala is well known…(4/5)
— Shazia Ilmi (@shaziailmi) September 10, 2022
इंग्रजी वर्तमानपत्राला पाठवलेल्या टिप्पणीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवेश कुमार चौधरी यांनी इल्मींचा लेख म्हणजे विश्व हिंदू परिषदला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचा दावा केला आहे.”शाझिया इल्मी या दिल्लीच्या उच्च वर्गातल्या अशा गटाचं प्रतिनिधित्व करतात जो चुकीची माहिती पसरवण्यासाठी ओळखला जातो.त्यांना संघाची विचारसरणी काय हे माहिती नाही. विशेषत: विश्व हिंदू परिषदेनं हिंदू संस्कृतीसाठी केलेलं काम त्यांना माहिती नाही”, असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे.
“त्या गुन्हेगारांचा सत्कार करणारे विश्व हिंदू परिषदेचे नव्हते. जिथे सत्कार झाला, ते कार्यालय देखील आमचं नव्हतं”, असाही दावा चौधरी यांनी केला आहे. दरम्यान, शाझिया इल्मींनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. “जर त्या गुन्हेगारांचा सत्कार करणारे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य नव्हते, तर मी माझ्या विधानासाठी माफी मागते”, असं या ट्वीटमध्ये इल्मी यांनी म्हटले आहे.





