“सांगलीकरांनी राऊतांना आवाज दिला पण तोच आवाज विरोधात वापरला” ; विशाल पाटलांची सडकून टीका, निवडणूक लढवण्यावर ठाम

Vishal Patil । सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. सुरुवातीला या जागेवर काँग्रेसचे विशाल पाटील उमेदवार असतील असे म्हटले जात होते. मात्र ठाकरे गटाकडून या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, आता या जागेचा मुद्दा हा प्रतिष्ठेचा बनला आहे. तसेच काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी या सर्व घडामोडीवर आपले मत मांडले आहे.
निवडणूक लढवण्यावर ठाम Vishal Patil ।
आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विशाल पाटील यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी विशाल पाटील यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह कायम ठेवला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी संजय राऊतांच्या विधानांवर नाराजीही व्यक्त केली आहे. “काँग्रेसनं विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचा विचार घेऊन माझ्या नावावर निर्णय घेतला. पण हा जागावाटपाचा तिढा अनपेक्षितपणे समोर आला. तरी ही जागा कुणी का मागितली या वादात न पडता आमच्या पक्षाच्या नेत्यांनी संयम पाळला. आम्ही कोणतंही वक्तव्य केलं नाही”, असे विशाल पाटील यांनी म्हटले.
“आमच्या मनात खंत” Vishal Patil ।
“संजय राऊतांना सांगलीकरांनी आवाज दिला. पण तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात सांगलीत वापरला गेला. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनात थोडी खंत जाणवते आहे. इथे दुसरा कोणता विषय चर्चेचा नाही. त्यांनी विश्वजीत कदम यांच्याबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही विधानं केली. विश्वजीत कदम सांगलीच्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं मांडत होते. अशावेळी त्यांच्याविषयी संशय घेऊन काहीतरी भूमिका मांडणं हे युती धर्माला शोभेसं नाही. विश्वजीत कदम कुठल्यातरी पक्षात जाणार आहेत असं कुणीतरी बोलणं चुकीचं आहे. ते आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत”, अशा शब्दांत विशाल पाटील यांनी संजय राऊतांवरची नाराजी बोलून दाखवली.
“संजय राऊतांनी सांगलीत यायचं कारण काय?” Vishal Patil ।
“सांगलीबाबत निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय? देशात निवडणूक जाहीर झालेली असताना संजय राऊतांनी २-३ दिवस इथे येऊन का वाया घालवावेत हा आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कदाचित या काळात त्यांना अंदाज आला असेल की सांगलीत परिस्थिती नेमकी काय आहे. त्यामुळे त्यांच्या हट्टात बदल झाला असेल अशी मी अपेक्षा करतो”, अशी खोचक टिप्पणीही विशाल पाटील यांनी केली.





