Ishan Kishan Statement : ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला मजा आली!’ आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर इशान किशनची प्रतिक्रिया
Ishan Kishan Statement : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) नवा कर्णधार इशान किशनने आपल्या पहिल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली.

Ishan Kishan Statement after RCB vs SRH match : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीकडून ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा (SRH) नवा कर्णधार इशान किशनने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वैयक्तिक ८० धावांची झंझावाती खेळी करूनही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या ईशानने सामन्यानंतरच्या सादरीकरणात मनमोकळेपणाने संवाद साधला.
आयपीएल २०२६ मधील आपल्या नेतृत्वाच्या पदार्पणात इशान किशनला संमिश्र अनुभवांचा सामना करावा लागला. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इशानने मान्य केले की, सुरुवातीच्या काही ओव्हर्सनंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी झाली होती. “आम्ही सुरुवातीलाच काही महत्त्वाचे विकेट्स गमावले, ज्याचा फटका बसला. पुढच्या वेळी आम्हाला शॉट निवडीमध्ये अधिक शहाणपणा दाखवावा लागेल,” असे इशान म्हणाला.
विराट कोहलीची विकेट गेमचेंजर –
This hug says it all, Virat Kohli has always admired and backed Ishan Kishan.❤️ pic.twitter.com/HljfvAijfq
— A N U J (@Hello_anuj) March 29, 2026
आरसीबीच्या फलंदाजीचे कौतुक करताना इशानने विराट कोहलीचा विशेष उल्लेख केला. तो म्हणाला, “आरसीबीने ज्या प्रकारे धावांचा पाठलाग केला, विशेषतः विराट भाईने, त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. विराट भाई मैदानावर टिकले तर त्यांना रोखणे अशक्य होऊन बसते. त्यांची विकेट लवकरात लवकर घेणे आमच्यासाठी अत्यंत गरजेचे होते, तिथेच आम्ही कमी पडलो.”
कर्णधारपदाचा आनंद आणि आगामी रणनीती –
पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना इशान म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला कर्णधारपद भूषवण्यात खूप मजा आली. आयपीएलमध्ये थोडी धाकधूक असतेच, पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. ही केवळ स्पर्धेची सुरुवात आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका स्वीकारार्ह आहेत.”
पुढच्या सामन्यात गोलंदाजीच्या विभागात अधिक सुधारणा करून संघ अधिक जोमाने मैदानात उतरेल, असा विश्वासही इशानने यावेळी व्यक्त केला. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत इशानने ज्या आत्मविश्वासाने नेतृत्व केले, त्याचे क्रिकेट तज्ज्ञांकडूनही कौतुक होत आहे.





