Virat Kohli Video : उर्विल पटेलच्या बॅटिंगची किंग कोहलीलाही पडली भुरळ! डगआऊटमधील टीव्हीवर पाहत होता ‘सिक्सर किंग’चा थरार
Virat Kohli Video : विराट कोहली उर्विलची फटकेबाजी पाहण्यात दंग झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Virat Kohli Watching Urvil Patel Batting Video Viral : आयपीएल २०२६ मध्ये रविवारी १० मे रोजी एक असा चमत्कार घडला ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत आहे. सीएसकेचा नवा स्टार उर्विल पटेलने लखनौविरुद्ध अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली. या वादळी खेळीने केवळ चाहत्यांनाच नाही, तर साक्षात ‘किंग’ विराट कोहलीलाही भुरळ घातली आहे. रायपूरमध्ये आपल्या सामन्याची तयारी करत असताना विराट कोहली उर्विलची फटकेबाजी पाहण्यात दंग झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराटचा वॉर्म-अप आणि उर्विलची फटकेबाजी –
रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने होते. पहिला सामना चेन्नईत सीएसके आणि एलएसजी यांच्यात झाला, तर दुसरा सामना रायपूरमध्ये आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार होता. जेव्हा चेन्नईत उर्विल पटेल लखनौच्या गोलंदाजांची धुलाई करत होता, तेव्हा रायपूरमध्ये विराट कोहली सरावात व्यस्त होता. सराव करताना ब्रेक घेतल्यावर विराट जेव्हा ‘एनर्जी ड्रिंक’साठी डगआऊटजवळ आला, तेव्हा त्याची नजर तिथे लावलेल्या टीव्हीवर पडली.
From Chennai to Raipur! 💛❤️
Even @imVkohli stopped for a moment to catch a glimpse of #UrvilPatel‘s historic 65(23) 👏#TATAIPL Revenge Week 2026 ➡️ #RCBvMI | LIVE NOW 👉https://t.co/y41wRLoDHD pic.twitter.com/3J2CfFkxbV
— Star Sports (@StarSportsIndia) May 10, 2026
टीव्हीवर उर्विल पटेलचे एकामागून एक बसणारे षटकार पाहून विराट काही काळ स्तब्ध झाला आणि एकटक ती फलंदाजी पाहू लागला. विराटने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, त्याच्या नजरेतून उर्विलबद्दलचे कौतुक स्पष्ट जाणवत होते.
चेन्नईचा ऐतिहासिक विजय –
उर्विल पटेलने आपल्या २३ चेंडूंच्या खेळीत ६५ धावा कुटल्या, ज्यामध्ये ८ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने ७ चेंडूंच्या अंतरात ६ षटकार ठोकले होते. या स्फोटक खेळीच्या जोरावर चेन्नईने २०४ धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठले. २०१९ नंतर पहिल्यांदाच चेन्नईने १८० पेक्षा जास्त धावांच्या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला आहे. उर्विलच्या या खेळीने चेन्नईला या हंगामातील सहावा विजय मिळवून दिला असून विराटने घेतलेली ही दखल उर्विलच्या भविष्यासाठी मोठी पोचपावती मानली जात आहे.





