Virat Kohli Retirement : विराट कोहलीच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीतील ५ अविस्मरणीय इनिंग्स

Virat Kohli’s Top 5 Test Innings : १२ मे २०२५ ला विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आणि चाहते पुरते हादरले. त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं! कसोटी हा त्याचा जिव्हाळ्याचा फॉरमॅट, पण त्याने हा निर्णय घेऊन सगळ्यांना धक्का दिला. खरं तर कुणाला वाटलं नव्हतं की विराट इतक्या लवकर कसोटी क्रिकेटच्या निरोप घेईल. चला, आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाच अफलातून खेळी पाहूया!
१) ११५ आणि १४१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अॅडलेड २०१४
२०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीला कर्णधारपद मिळाले. कर्णधार झाल्यानंतर तो एका वेगळ्याच रूपात दिसला. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने शानदार फलंदाजी केली. त्याने तिथे १४१ धावांची खेळी खेळली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्या सामन्यात भारताला ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ११५ धावा केल्या होत्या. कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात दोन्ही डावात शतके करणारा तो पहिला भारतीय ठरला.
२) १४९ विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम २०१८
विराट कोहलीचा त्याच्या कारकिर्दीतील पहिला इंग्लंड दौरा खूपच वाईट होता. २०१४ मध्ये विराटच्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यात त्याला जेम्स अँडरसनने खूप त्रास दिला होता. त्या मालिकेत विराटला १० डावांमध्ये फक्त १३४ धावा करता आल्या. पण जेव्हा कोहली दुसऱ्यांदा इंग्लंड दौऱ्यावर गेला. तेव्हा त्याने शानदार फलंदाजी केली. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात विराटने १४९ धावा केल्या. तेंडुलकरनंतर एजबॅस्टनमध्ये कसोटी शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याच्या शानदार खेळीनंतरही, भारताने सामना ३१ धावांनी गमावला.
३) १५३ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन २०१८
सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. कोहली दहाव्या षटकातच फलंदाजीला आला. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ३३५ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने ३०७ धावा केल्या. विराटने शानदार फलंदाजी केली आणि संघाला ३०० च्या पुढे नेले. त्या डावात विराटने १५३ धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. त्याच्या शानदार खेळीनंतरही, इतर कोणत्याही फलंदाजाने कोहलीला साथ न दिल्याने भारताने सामना १३५ धावांनी गमावला.
४) नाबाद २५४ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पुणे २०१९
विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मयंक अग्रवालने शतक झळकावले, तर विराटने द्विशतक झळकावले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील सातवे द्विशतक होते. त्याने शानदार फलंदाजी केली आणि २५४ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळेच भारताने तो सामना एक डाव आणि १३७ धावांनी जिंकला.
हेही वाचा – Virat Kohli Retirement : ‘तुझा तो भाव आजही माझ्या मनाला स्पर्श करतो…’, विराटच्या निवृत्तीवर सचिन भावुक
५) २३५ विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, २०१६
वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धची त्याची २३५ धावांची खेळी कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. ३४० चेंडूंच्या या डावात त्याने इंग्लंडच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा चांगला सामना केला. त्याच्या खेळीमुळेच भारताला ६३१ धावांचा टप्पा गाठता आला. त्यानंतर भारताने तो सामना एक डाव आणि ३६ धावांनी जिंकला.





